तुळजापूर -: तालुक्‍यातील धोत्री ग्रामपंचायतीच्‍या सरपंच, उपसरपंच पदाची निवड चक्‍क पती-पत्‍नी  या दाम्‍पत्‍याची निवड करण्‍यात आली आहे. सरपंचपदी अश्विनी साठे तर उपसरपंचपदी शिवाजी साठे या दाम्‍पत्‍याची बिनविरोध निवड करण्‍यात आली असून ही ग्रामपंचायत कॉंग्रेस पक्षाच्‍या ताब्‍यात गेली आहे. संपूर्ण तालुकावासियातून व राजकीय वर्तुळात या आगळ्यावेगळ्या झालेल्‍या निवडणुकीबद्दल जोरदार चर्चा रंगत आहे. 
              ग्रामीण भागात ग्रामपंचायतीवर वर्चस्‍व मिळविण्‍यासाठी जोरदार रस्‍सीखेच होताना ग्रामीण भागातील चित्र पहावयास मिळते. त्‍यासाठी स्‍थानिक पुढा-याकडून जोरदार प्रयत्‍न होताना दिसते. सत्ता मिळाल्यानंतर सरपंच अथवा उपसरपंच पदासाठीही मोठी रस्सीखेच होताना आजपर्यंत पाहिले आहे. परंतु धोत्री ग्रामपंचायतीच्‍या सरपंच व उपसरपंच हे मानाचे दोन्ही पदे सत्‍ता रूपाने एकाच कुटुंबियात विशेषत: पती, पत्‍नीस मिळाल्‍याची दुर्मिळ घटना म्‍हणून चर्चिली जात आहे.  तालुक्यातील 14 ग्रामपंचायतमधील सरपंच व उपसरपंचाची निवड शनिवारी (दि. 24) करण्यात आली. धोत्री ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा फडकला असून, सरपंचपदी अश्विनी साठे तर उपसरपंचपदी त्यांचे पती शिवाजी साठे यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्वत्र या पदासाठी ओढाताण होत असताना साठे दाम्पत्याची निवड मात्र बिनविरोध पार पडली आहे. या दाम्‍पत्‍याचे सर्वत्र अभिनंदन करून सत्‍कार केले जात आहे.  

 
Top