नळदुर्ग -: ऊसाला प्रतिटन तीन हजार रुपयेचा पहिला हप्ता शासनाने जाहीर करावा, अन्यथा दिवाळीच्या सणातच आमदार, मंत्र्यांच्या घरासमोर संघटनेच्यावतीने ‘तुमची दिवाळी, आमचा शिमगा’ असा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सत्तार पटेल यांनी रविवार रोजी दुपारी बारा वाजता नळदुर्ग येथे रास्तो रोको आंदोलनवेळी केला.
नळदुर्ग येथील बसस्थानका समोर रविवार दि. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पटेल हे बोलताना पुढे म्हणाले की, सरकार ऊस दराबाबत हस्तक्षेप करायला तयार नाही, कारखानदार यांनी शेतक-यांना काय भाव द्यायचे ते पाहून घेतील, सरकार मध्यस्थीची भूमिका बजावू नये, त्यास आम्ही समर्थ आहोत असे सांगून सरकारला मध्यस्थी करायची नसेल तर आपली पोलीस यंत्रणाही आम्हापर्यंत पाठवू नये, पोलीस पाठवायचे असतील आमच्या बाजूनेच पाठवा, आम्ही मालक आहोत, पांढर्या वेशातले कारखानदार हे दरोडेखोर असल्याची टीका पटेल यानी सांगितले. तसेच शेतकरी संघटनेने कधीही जास्त भावाची मागणी केली नाही तर रास्त भावाची मागणी केली आहे. चालू वर्षी साखरेचे भाव ३ हजार ६०० रुपये क्विंटल बाजार भाव पाहता पहिला हप्ता तीन हजार रुपये द्यावे, अशीही त्यानी मागणी केली.
रास्ता रोको आंदोलनाच्या पूर्वी नळदुर्ग शहरातील चावडी चौकातून घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. बसस्थानक समोर या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, मराठवाडा अध्यक्ष सत्तार पटेल, तुळजापूर युवक तालुका प्रमुख गौरीशंकर गोगावे, तालुका उपप्रमुख सुनिल चौधरी, पिंटू गव्हाणे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, विष्णू घोडके, राजा जाधव, दिपक निकम, गणेश पेंदे, नकुल वाघमारे यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन नळदुर्ग मंडळ अधिकारी माणिकराव पवार, तलाठी एस.एन. कोकणे याना देण्यात आले. रास्ता रोकोमुळे राष्ट्रीय महामार्गावर दुर्तफा वाहनांची मोठी रांग लागली होती.अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गायकवाड यानी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.