
आपल्या शोकसंदेशात चव्हाण म्हणतात, मराठी माणसाच्या हितरक्षणाचा मुद्दा हाती घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना या संघटनेची स्थापना केली. कालांतराने या संघटनेचे रुपांतर एका राजकीय पक्षामध्ये झाले. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विविध विषयांवर छेडलेली आंदोलने प्रभावी ठरली. स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न असो की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न असो त्यांची आंदोलने नेहमीच चर्चेचा विषय ठरली.
श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेणारे थेट आणि बेधडक वक्तृत्व, कमालीचा स्पष्टवक्तेपणा, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता केलेली टीका ही त्यांच्या भाषणांची वैशिष्ट्ये असत. त्यामुळेच दरवर्षी विजयादशमीला शिवाजी पार्कच्या सभेत होणारे त्यांचे भाषण हा प्रत्येकाच्या औत्सुक्याचा विषय असे. व्यंगचित्रकार म्हणुनही ते महान होते. सुरुवातीला फ्री प्रेस जर्नल आणि नंतर स्वत:च्या मार्मिकच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी भल्याभल्यांना जेरीला आणले. त्यांच्या निधनाने एक लढाऊ नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात श्री.चव्हाण यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.