मुंबई -: मत्स्यव्यवसाय विभागाच्या वर्सोवा - मुंबई प्रशिक्षण केंद्राचे 109 वे प्रशिक्षण सत्र दि. 1 जानेवारी 2013 पासून सुरु होत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व मच्छिमार युवकांनी अर्ज करावा, असे विभागामार्फत कळविण्यात आले आहे. या सत्रात ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिनची देखभाल  व निगा’ याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणासाठी दारिद्रय रेषेवरील उमेदवारांस दरमहा 450 रुपये व दारिद्रय रेषेखालील उमेदवारांस 100 रुपये इतके प्रशिक्षण शुल्क असेल. प्रशिक्षण पात्रतेसाठी खालील निकष असतील. इच्छुक उमेदवार 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावा, किमान शैक्षणिक पात्रता चौथी पास व पोहता येणे आवश्यक असून उमेदवार क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असावा. मासेमारीचा किमान दोन वर्षाचा अनुभव तसेच त्याच्याकडे स्मार्टकार्ड असणे आवश्यक आहे, नसल्यास त्यासाठी अर्ज केल्याची प्रत जोडावी. अर्ज विहित नमुन्यात व मच्छिमार सहकारी संस्थांच्या शिफारसपत्रासह असणे आवश्यक आहे. उमेदवार दारिद्रय रेषेखाली असल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत  जोडणे आवश्यक आहे.
वरील अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी स्वत:च्या हस्ताक्षरातील अर्ज संस्थेच्या शिफारशीसह शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा-मुंबई, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, अंधेरी (प), मुंबई 400061या कार्यालयाकडे दि. 12 डिसेंबर 2012  रोजी किंवा त्यापूर्वी पोहचतील असे पाठवावेत. विहित नमुन्यातील छापील अर्ज या कार्यालयात उपलब्ध आहेत. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, असे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा- मुंबई यांनी कळविले आहे.
 
Top