अणदूर -: अणदूर (ता. तुळजापूर) येथे ग्रामदैवत श्री खंडोबाची यात्रा शुक्रवार दि. १४ डिसेंबर रोजी भरत असून त्‍यानिमित्‍त विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्‍याची माहिती मंदिर समितीने पत्रकाद्वारे दिली.
        श्री खंडोबाचे राज्‍यासह कर्नाटकात १०८ ठिकाणे असून अणदूर-मैलारपूरच्‍या (नळदुर्ग) खंडेरायाच्‍या स्थानाचे वेगळे महत्त्व आहे. नळ राजाची पत्‍नी दमयंती राणीच्या भक्तीसाठी खंडोबा येथे प्रकट झाले, अशी आख्यायिका आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अणदूर व मैलारपूर (नळदुर्ग) या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे असून दोन्ही ठिकाणचे अंतर चार कि.मी. आहे. खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने तर मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. अणदूरच्या यात्रेनंतर खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे शनिवार दि. १५ डिसेंबर रोजी प्रस्थान होणार आहे.
     खंडोबा यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता श्री खंडोबाची महापूजा होईल. रात्री दहा वाजता श्रीचा छबीना - मिरवणुक काढण्यात येईल. रात्री १२ वाजता नळदुर्गच्या मानकर्‍यांचे आगमन, त्यानंतर मानपानाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) च्या मानकर्‍यांत खंडोबाची मूळ मूर्ती नेणे व आणण्याचा लेखी करार होईल. मध्यरात्री २.३० वाजता खंडोबाच्या मूर्तीच्या पालखीचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होईल. पहाटे ५ वाजता मैलारपूर (नळदुर्ग) मंदिरात खंडोबाचे आगमन नंतर विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल.
     खंडोबा यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, तसेच भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खंडोबा मंदिर समिती व खंडोबा यात्रा कमिटी यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रयत्‍नशील आहे.
 
Top