नळदुर्ग :- यमगरवाडी (ता. तुळजापूर) येथील  प्रकल्पावर आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा, मंगरूळ (ता. तुळजापूर) या शाळेतील विद्यार्थी कु. अर्जुन राजाबाबु राठोड व सुरज काळे या विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला रेशनिंग ऑफ नॅचरल रिसोर्सेस या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला. विशेष म्हणजे मागील चार वर्षातील शाळेचे हे तिसरे विजेतेपद आहे. सदरील प्रदर्शनात तुळजापूर तालुक्यातील प्राथमिक गटातुन 71 शाळांनी सहभाग नोंदविला होता.
    सद्य स्थितीत जाणवत असलेली इंधन टंचाई व पाण्याचे दुर्भिक्ष भविष्‍यात लवकर जाणवु नये यासाठीचे उपाय या प्रकल्पातुन सुचविले आहेत. यासाठी भुजल नियमन यंत्रणा व खनिज तेल नियंत्रण यंत्रणा उभारून लोकांना ए.टी.एम कार्ड व सिमकार्ड यांच्याद्वारे खनिज तेल मिळविण्याचा व जमिनीतील पाणी उपसण्याचा कोटा ठरवुन देण्याची पध्दती सुचविली आहे. या प्रकल्पाची देशात अंमलबजावणी केल्यास सर्वांना नैसर्गिक संपत्तीवर समान अधिकार मिळवुन देणे सोईचे जाणार आहे व नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन होणार आहे. हा प्रकल्प आता जिल्हास्तरीय प्रदर्शनात सादर केला जाणार आहे. हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी विज्ञान शिक्षक दयानंद भडंगे, पाटील यांनी मार्गदर्शन केले. विजयी स्पर्धाकाचे अभिनंदन मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, संस्थेचे पदाधिकारी अभय शहापूरकर, महादेवराव गायकवाड, चंद्रकांत गडेकर, उमाकांत मिटकर यांनी केले आहे

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
    गटशिक्षण अधिकारी कार्यालय, तुळजापूर व एकलव्य विद्या संकुल यांच्‍या संयुक्त विद्यामाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यमगरवाडी (ता. तुळजापूर) येथे दि. 12 डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनामध्ये तुळजापूर तालुक्यातील प्राथमिक गटातुन 71 तर माध्यमिक गटातुन 34 शाळा सहभागी झाल्या होत्या. स्पर्धकांची एकुण संख्या 212 एवढी असुन स्पर्धकांनी मांडलेले विज्ञान साहित्य पाहण्यासाठी तालुक्यातील विविध शाळांतील 2000 विद्यार्थ्‍यांनी प्रदर्शन स्थळाला भेट दिली.
     या प्रदर्शनाचे उद्घाटन 12 वाजुन 12 मिनीटांनी जिल्हा परिषद सभापती पंडित जोकार यांचे हस्ते झाले. या प्रसंगी जि.प. सदस्य धिरज अप्पासाहेब पाटील, पंचायत समिती सदस्य अयोध्या काळदाते, दिलीप भोकरे, गटशिक्षणाधिकारी सौ. सविता भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी डॉ. अभय शहापूरकर, चंद्रकांत गडेकर, महादेव गायकवाड, उमाकांत मिटकर यांची उपस्थिती होती. या प्रसंगी प्रमुख पाहुणे धिरज पाटील, डॉ. अभय शहापूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर प्रमुख पाहुण्यांनी व प्रदर्शनासाठी उपस्थित शिक्षकांनी संस्थेच्या विज्ञान प्रयोग शाळा, संगणक कक्ष, डिजीटल क्लास रूम या उपक्रमांना भेट देवून कार्याचे कौतुक केले.
    याप्रसंगी उत्तम सोई सुविधा उपलब्ध करून दिल्याबदल विठ्ठल म्हेत्रे व दयानंद भडंगे यांचे अभिनंदन गटविकास अधिकारी तृप्‍ती ढेरे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप गटविकास अधिकारी तृप्‍ती ढेरे व सविता भोसले यांच्या उपस्थितीत विजेत्‍यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी एकलव्य विद्या संकुलातील कर्मचारी, कार्यकर्त्‍यांनी परिश्रम घेतले.



 
Top