मुंबई : आजचा वर्तमान हा उद्याचा इतिहास आहे. त्यामुळे भविष्यातील चुका टाळण्यासाठी इतिहासापासून आपण बरेच काही शिकू शकतो. या न्यायाने इतिहास हा मानवाचा वैश्विक गुरु आहे, असे उद्‌गार राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी भारतीय इतिहास परिषदेच्या (दि इंडियन हिस्ट्री काँग्रेस) 73 व्या अधिवेशनाचे उद्घाटन करताना काढले.
        मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाने कलिना कॅम्पस् येथे आयोजित केलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन आज राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री डी . पी. सावंत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळूकर, भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष वाय. सुब्बरायल, मावळते अध्यक्ष डॉ. पी.बी. चौधरी, प्रा. इरफान हबीब, इतिहास संशोधक, इतिहास प्रेमी, विद्यार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
       भारताला वैभवशाली इतिहास असून, तो वस्तुनिष्ठ आणि धर्मनिरपेक्ष स्वरुपात लोकांसमोर यावा यासाठी भारतीय इतिहास परिषदेने मोठे योगदान दिले आहे. आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनातूनही विद्यार्थी आणि संशोधकांना भारतीय इतिहासाविषयी बहुमोल माहिती मिळेल, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. इतिहास हा विषय उच्च शिक्षणासाठी निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत या अधिवेशनाला लाभलेली उपस्थिती पाहून आनंद झाला, असे सांगून राज्यपाल म्हणाले, बालवर्गापासूनच विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लावायला हवी. विद्यार्थ्यांमधून चारित्र्यसंपन्न नागरिक घडवण्यासाठी देशाचा वैभवशाली इतिहास आणि परंपरा समजावून सांगायला हव्यात. सर्व इतिहास प्रेमींनी पंडित जवाहरलाल नेहरुंचे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक अवश्य वाचायला हवे. यावेळी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
    मुंबई विद्यापीठाला तिसऱ्यांदा भारतीय इतिहास परिषदेचे अधिवेशन आयोजित करण्याचा मान मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करुन श्री. राजेश टोपे म्हणाले, या अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातील इतिहास तज्ज्ञ, इतिहास संशोधक, शिक्षक एकत्र येणार असल्यामुळे हे अधिवेशन म्हणजे इतिहासाला नवे आयाम देणारे उत्तम व्यासपीठ आहे. देशापुढे असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी इतिहास माहित असणे गरजेचे आहे. विद्यापीठातून संशोधनास अधिक प्रोत्साहन देण्यासाठी संशोधकांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवरही संशोधन केल्यास देशातील विद्यापीठे जागतिक दर्जाची होण्यासाठी  अशा संशोधनाची मदत होईल, असे श्री. टोपे यांनी सांगितले.
         अधिवेशनासाठी देशभरातून आलेल्या इतिहास संशोधकांचे स्वागत करुन राज्यमंत्री श्री. सावंत म्हणाले, इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमानकाळ यामधील संवाद आहे. आपण जीवनातून इतिहासाला वजा करु शकत नाही. युवापिढीला स्वातंत्र्यासाठी मोजावी लागणारी किंमत तसेच देशाचा खरा इतिहास कळायला हवा.
    तब्बल 32 वर्षांनंतर भारतीय इतिहास परिषदेच्या अधिवेशनाचे आयोजन करण्याची संधी मुंबई विद्यापीठाला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करुन राजन वेळुकर म्हणाले, इतिहासावरील शास्त्रीय लिखाणाला प्रोत्साहन देणे, संबंधित विविध संस्थांना एकत्रित करणे आणि वस्तुनिष्ठ संशोधनाला प्रोत्साहन देणे हे या अधिवेशनाचे उद्दिष्ट आहे. या अधिवेशनात सुमारे 1000 संशोधनपर निबंध सादर होणार आहेत. तसेच इतिहास अधिक चांगल्या प्रकारे समजण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
       वाय सुब्बरायलू यांनी दक्षिणेतील ‘नाडू’ या उत्तर भारतातील  ‘विषय’ या संज्ञेची व्याप्ती आणि त्यांच्यातील फरक या विषयी सखोल माहिती सांगितली.
          महाराष्ट्रातील कोळी नृत्य, दिंडी, वाघ्यामुरळी, वासुदेव, दशावतारी, लेझीम, ढोल आदी लोककलांचे दर्शन घडविणाऱ्या शोभा यात्रेने  या अधिवेशनाची सुरुवात झाली. अधिवेशनाचे उद्घाटनही नगारा आणि घंटा वादनाने करण्यात आले.

 
Top