मुंबई : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याच्यादृष्टीने जागा निश्चितीसाठी आज दोन ते तीन पर्याय निवडले असून, काही विभागांच्या सर्वेक्षणाच्या अंतिम निष्कर्षानंतर लवकरच ही जागा निश्चित केली जाईल, असे मुंबई शहराचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
     अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याच्यादृष्टीने पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  शासनाने समन्वय समितीचे गठन केले आहे. समिती अध्यक्ष म्हणून कामाला गती देण्याच्यादृष्टीने आज श्री. पाटील यांनी स्मारकाच्या जागेच्या निश्चितीसंदर्भात अरबी समुद्रात पाहणी केली. त्यानंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
     त्यांच्यासमवेत सामान्य प्रशासन विभाग, पर्यावरण विभाग, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी, नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशनाग्राफी, नॅशनल इन्वारमेंटल इंजिनिअरिंग इन्स्टिट्युटचे शास्त्रज्ञ, स्मारकाचे मुख्य वास्तु विशारद आदी मान्यवर उपस्थित होते.
     स्मारकाचे काम वेगाने पूर्ण होण्याच्यादृष्टीने केंद्र सरकार तसेच पर्यावरण विभागासह अन्य संबंधित विभागाच्या परवानग्या लवकरच घेतल्या जातील असे सांगून पाटील म्हणाले, स्मारकाची जागा निश्चित करताना त्याचा बेस मजबूत असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने काही विभागांना निवड केलेल्या जागांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना आपण दिल्या असून, या सर्वेक्षणाच्या अंतिम निष्कर्षानंतर स्मारकाची जागा निश्चित केली जाईल. या स्मारकाच्या कामाला सर्व विभागाच्या समन्वयातून वेग देऊन मुंबईत अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाईल असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
 
Top