अहमदाबाद -: अखेरच्‍या षटकापर्यंत रंगलेल्‍या रोमांचक सामन्‍यात भारताने पाकिस्‍तानला 11 धावांनी पराभूत केले. भारताने दिलेल्‍या 193 धावांच्‍या आव्‍हानाचा पाठलाग करताना पाकिस्‍तानने 7 बाद 181 धावा काढल्‍या. अखेरच्‍या षटकात पाकिस्‍तानला 20 धावांची गरज होती. परंतु, इशांतने फटकेबाजीची संधी दिली नाही.
       मोठ्या धावसंख्‍येचा पाठलाग करताना पाकिस्‍तानच्‍या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. नासिर जमशेद आणि अहमद शेहजाद यांनी 74 धावांची सलामी दिली. परंतु, 84 धावांमध्‍ये पाकिस्‍तानचे दोन्‍ही सलामीवीर परतले. नासिर जमशेद आणि अहमद शेहजाद यांनी पॉवर प्‍लेच्‍या 6 षटकांमध्‍ये 54 धावा कुटल्‍या. दोघांनी त्‍यानंतरही फटकेबाजी सुरु ठेवली. अखेर ही जोडी आर. अश्विनने फोडली. त्‍याने जमशेदला झेलबाद केले. जमशेदने 32 चेंडुंमध्‍ये 41 धावा काढल्‍या. त्‍यानंतर युवराजने शेहजादला बाद केले. समोर येऊन युवराजला षटकार खेचण्‍याच्‍या नादात तो यष्‍टीचीत झाला. त्‍याने 31 धावा काढल्‍या.

त्‍यानंतर पाकिस्‍तानचा कर्णधार मोहम्‍मद हाफिजने तडाखेबाज अर्धशतक झळकावून आव्‍हान कायम ठेवले. ऐन मोक्‍याच्‍या क्षणी हाफिज आणि कामरान अकमलला अशोक डिंडाने बाद केले आणि सामना भारताच्‍या बाजुने झुकला. या दोन विकेट्स टर्निंग पॉईन्‍ट ठरल्‍या. हाफिजने अवघ्‍या 23 चेंडुंमध्‍ये अर्धशतक ठोकले. त्‍याने 26 चेंडुंमध्‍ये 3 षटकार आणि 6 चौकारांसह 55 धावांची स्‍फोट खेळी केली. हाफिज आणि उमर अकमलने आक्रमक फलंदाजी करुन 33 चेंडुंमध्‍ये  62 धावांची भागीदारी केली. अखेर अशोक डिंडाने ही जोडी फोडली. त्‍याने अकमलचा त्रिफळा उडविला. त्‍यापुर्वीच्‍या षटकात भुवनेश्‍वर कुमारने धोकादायक शाहिद आफ्रिदीची विकेट घेतली. तो बाद झाला त्‍यावेळी पाकिस्‍तानला 13 चेंडुंमध्‍ये 30 धावांची गरज होती.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी
 
Top