नळदुर्ग -: बचत गटाच्‍या माध्‍यमातून महिला आर्थिक विकासाकडे वाटचाल करत आहोत. महिला सक्षमीकरणासाठी राज्‍य व केंद्र शासनाच्‍या विविध योजना असून या योजनांच्‍या माध्‍यमातून महिलांनी आपला व कुटुंबाचा विकास अधिक गतिमान करावा, असे आवाहन उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी केले. 
      नळदुर्ग नगरपालिकेच्‍यावतीने हुतात्‍मा बाबुराव बोरगांवकर उद्यानात आयोजित महिला बचतगट मेळाव्‍याचे उदघाटन पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते झाले. त्‍यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हा कॉंग्रेस कमिटीचे अध्‍यक्ष आप्‍पासाहेब पाटील हे होते. तर जिल्‍हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे, तुळजापूर पंचायत समिती सभापती मनिषा पाटील, न.पा. चे प्रभारी नगराध्‍यक्ष शहबाज काझी, मुख्‍याधिकारी राजेश जाधव, तहसिलदार व्‍ही.एल. कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
       पालकमंत्री ना. चव्‍हाण म्‍हणाले की, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थात महिलाना पन्‍नास टक्‍के आरक्षण, बचतगटांना अनुदान देऊन महिलांना रोजगार उपलब्‍ध करून देण्‍याचे काम शासन करत आहे. ज्‍या बचतगटांना कर्ज मिळाले, त्‍यांनी जोमाने कामे करावी, काम करणा-या बचतगटांना कर्ज मिळवून देऊ, त्‍यामुळे त्‍यांचा कुटुंबाचा आर्थिक विकास होईल, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त करून बचतगटाने उत्‍पादित केलेल्‍या वस्‍तूंना योग्‍य भाव मिळण्‍यासाठी बाजारपेठ मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने शासन प्रयत्‍नशील आहे. त्‍यामुळेच त्‍यांचा आर्थिक विकास होतो. महिलांनी दुग्‍धव्‍यवसाय, शेळीपालन आणि कुक्‍कुटपालन या लघु उद्योगाकडेही वळले पाहिजे, तसेच समाजात स्‍त्रीभ्रूण हत्‍येसारख्‍या घटना घडता कामा नये. त्‍यासाठी महिलानी पुढाकार घ्‍यावे, असे आवाहनही ना. चव्‍हाण यांनी उपस्थित महिलाना केले.
        जिल्‍हाधिकारी नागरगोजे म्‍हणाले की, महिलांचे सक्षमीकरण झाल्‍याशिवाय समाजाची प्रगती होत नाही. महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले पाहिजे. बचतगट स्‍थापन केले तर महिलांचे अर्थाजन वाढून त्‍यांचा विकास होऊ शकतो. महिलांची पन्‍नास टक्‍के पेक्षा अधिक उपस्थिती आहे ही आनंदाची बाब आहे, असे सांगून पाणी ही नैसर्गिक संपत्‍ती असून त्‍याचा महिलांनी काटकसरीने वापर करावा, असेही त्‍यांनी शेवटी सांगितले. 
        यावेळी जिल्‍हा कॉंग्रेस कमिटीचे अध्‍यक्ष आप्‍पासाहेब पाटील, दमयंती महिला शिक्षण संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा सुभद्रा मुळे, पं.स. सभापती मनिषा पाटील, नगरसेविका मुन्‍वर सुलताना, माजी नगराध्‍यक्ष दत्‍तात्रय दासकर यांनी मेळाव्‍यात महिलांना मार्गदर्शन केले. 
        या मेळाव्‍यात अकरा बचत गटांना प्रत्‍येकी सहा लाख, सात बचतगटांना प्रत्‍येकी दहा हजार रूपयेप्रमाणे फिरत्‍या निधीचे वितरण, विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य करणा-या व्‍यक्‍तींचा सत्‍कार, संविधान दिनानिमित्‍त घेण्‍यात आलेल्‍या निबंध स्‍पर्धेचे बक्षीस वितरण, रमाई आवास योजनेंतर्गत 44 घरकुलांचे प्रमाणपत्र वाटप यावेळी पालकमंत्री ना. चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. 
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्‍ताविक प्रभारी नगराध्‍यक्ष शहबाज काझी यांनी केले. या कार्यक्रमास स्‍वच्‍छता व आरोग्‍य सभापती सौ. मंगल सुरवसे, पाणीपुरवठा सभापती सौ. मुन्‍वर सुलताना, तालुका दक्षता समितीच्‍या सदस्‍या शाहेदाबी सय्यद नगरसेवक शब्‍बीर सावकार, माजी नगराध्‍यक्ष उदय जगदाळे माजी नगसेवक सुधीर हजारे, पिंटू बनसोडे यांच्‍यासह नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी, महिला बचतगट प्रतिनिधी यांची मोठ्या संख्‍येनी उपस्थिती होती.
 
Top