सोलापूर :  राज्यातील ग्रामपंचायती हायटेक व अधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून त्याअंतर्गत तालुकास्तरावरुन मिळणारी 19 शासकीय दाखले आता लवकरच ग्रामपंचायत स्तरावरुन उपलब्ध करुन देण्यात येतील अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केली.
    अक्कलकोट पंचायत समिती विस्तारीत नुतन इमारतीचे उदघाटन ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशीगंधा माळी, माजी उपमुख्यमंत्री आ. विजयसिंह मोहिते पाटील, आ. दिपक साळुंखे पाटील, आ. सिद्रामप्पा पाटील, जिल्हा परिषद  उपाध्यक्ष सुभाष गुळवे, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे, शिक्षण सभापती शिवानंद पाटील, पंचायत समिती सभापती विमल गव्हाणे, उपसभापती सोनाबाई आलुरे, जिल्हाधिकारी गोकुळ मवारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार उपस्थित होते.
    यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री श्री. पाटील म्हणाले की, पंचायत राज व्यवस्थेतील तीन्ही स्तरांना राज्य सरकारकडून बळ देण्याचे काम सातत्याने होत आहे. यासाठी ग्रामविकास विभागाने अनेक क्रांतीकारी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. इकोव्हीलेज अंतर्गत गावे चांगली आणि समृध्द करण्यावर भर दिला जात आहे. आता शाळांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद शाळांचे मुल्यांकन करण्यात येणार असून 200 गुणांच्या आधारावर त्यांची अ,ब,क,ड,इ अशी वर्गवारी करण्यात येणार आहे. असेही श्री. पाटील म्हणाले.
    दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वेगवेगळया उपाययोजना करुन केवळ दुष्काळी कामांसाठी पाच कोटी रुपये जिल्हाधिका-यांकडे कायमस्वरुपी ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासन हजारो कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करीत असून पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी एकोव्हिलेज योजना उपयुक्त असून यामध्ये केलेल्या वृक्षसंवर्धनामुळे निश्चीतच पर्जन्यमानामध्ये सकारात्मक फरक पडणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गावांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
    जिल्हास्तरावरील रस्ते सुधारण्यासाठी सर्व प्रमुख जिल्हा मार्ग  सार्वजनि‍क बांधकाम विभागाकडे वर्ग करुन जिल्हयातील इतर लहान मार्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे सोपविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून सोलापूर जिल्हा परिषदेच्या रस्त्याच्या सर्व कामांना मंजुरी देऊन कोणत्याही विकास कामांकरीता अनुदानाची अडचण भासू दिली जाणार नाही. तसेच ग्रामविकास, महसूल यासह नागरिकाभिमुख कार्यालयांमधील पद भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचाही उल्लेख ग्रामविकास मंत्र्यांनी केला.
    पालकमंत्री श्री. ढोबळे आपल्या भाषणात म्हणाले की, अक्कलकोट तालुक्यातील पाणी प्रश्न मिटविण्यासाठी 11 कोटी रुपयांची सुजल योजना सुरु करण्यात आली असून रस्त्यांसाठी 72 कोटी रुपये आणि नागरी सुविधांसाठी 24 कोटी रुपये देण्यात आले आहेत. दुष्काळी गावांनी पिण्याच्या पाण्याचे 33 टक्के वीज बिल भरल्यास उर्वरित 67 टक्के रक्कम आणि प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे सर्व वीज देयक शासन भरणार आहे.  अक्कलकोटला पाणीपुरवठा करणारी  हळ्ळी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन बदलण्याचा विचार असल्याचे पालकमंत्र्यांनी  सांगितले.
    ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले की, ग्रामपंचायत व पंचायत समिती ही सामान्य माणसांची महत्वाची केंद्रे आहेत. या केंद्रामधून चांगल्या सेवा दिल्या गेल्या पाहिजे. राज्यात प्रत्येक पंचायत समितीची सुसज्ज इमारत बांधण्याचा ग्रामविकास विभागाचा प्रयत्न असून ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम योजना संपूर्ण गावांमधून राबविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबध्द असून बचत गटांच्या रुरल मॉलसाठीही शासन सर्व प्रकारे निधी उपलब्ध करुन देत असल्याचा उल्लेख ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी केला.                    
    माजी उपमुख्यमंत्री आ. मोहिते पाटलांनी शासनाकडून चांगल्या योजना सुरु असून प्रशासनाकडून त्या योग्य प्रकारे कार्यान्वित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.  जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. माळी यांनी जिल्हा परिषदेतील सर्व रिक्त पदे भरण्याची मागणी आपल्या भाषणातून केली. कार्यक्रमात आ. दिपक साळुंखे, आ. सिद्रामप्पा पाटील, माजी गृहराज्य मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचीही यथोचित भाषणे झाली.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती विमल गव्हाणे यांनी तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कासार यांनी मानले.कार्यक्रमास अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांच्यासह अनेक प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
 
Top