महामार्ग पोलीस केंद्र नळदुर्ग येथील पोलीस अधिकारी गेल्‍या अडीच महिन्‍यापासून बेपत्‍ता आहेत. अगोदरच अपुरे कर्मचारी असल्‍याने व कार्यक्षेत्र मोठे असल्‍याने पोलीसाना कर्तव्‍य बजावताना मोठी कसरत करावी लागत आहे. बेपत्‍ता अधिकारी गणेशोत्‍सवाच्‍या बंदोबस्‍तासाठी नळदुर्ग येथून मुंबईकडे गेलेले असून त्‍यांचा रजेचा अर्ज किंवा आजारी असल्‍याचे अर्ज अथवा कसलीही माहिती येथील महामार्ग पोलीस केंद्रात उपलब्‍ध नसल्‍याचे समजते. याप्रकरणी जिल्‍हा पोलीस दलात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
          सोलापूर-हैदराबाद राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर नळदुर्ग शहर आहे. या महामार्गावर सतत रस्‍ते अपघात होतात. त्‍यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. अनेक वाहनचालक वाहतुकीच्‍या नियमाचे उल्‍लंघन करीत असल्‍याने सतत अपघात होत असल्‍याने तसेच अपघातानंतर जखमीना तातडीने मदत करता यावी, याकरीता शासनाने महामार्ग पोलीस केंद्र नळदुर्ग येथे दोन वर्षापूर्वी उघडले आहे. महामार्गाचे कार्यक्षेत्र राष्‍ट्रीय महामार्गावरील खानापूर (ता. तुळजापूर) ते तलमोड (ता. उमरगा), तामलवाडी (ता. तुळजापूर) ते शिंगोली (उस्‍मानाबाद) असे असून सध्‍या नळदुर्ग महामार्ग पोलीस केंद्रात तीन अधिकारी, नऊ पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. मात्र दि. 15 सप्‍टेंबर रोजी गणेशोत्‍सवाच्‍या बंदोबस्‍तासाठी पोलीस उपनिरीक्षक के.के. शिंदे हे मुंबई येथे पाठविण्‍यात आले होते. मात्र त्‍यानंतर आजतागायत नळदुर्गला परतलेच नाही. येथील अधिका-यानी वरिष्‍ठांना वेळोवेळी माहिती पाठविली आहे. शिंदे यांचे रजेचा अर्ज नाही. आजारी असल्‍याचे पत्र नाही, त्‍यांच्‍याबद्दल कसलीही माहिती पोलीसाकडे नसल्‍याचे बोलले जात आहे. त्‍यांचे मोबाईल फोनही बंद आहे. शिंदे हे यापूर्वी महामार्ग पोलीस मुख्‍यालय मु्ंबई येथे कार्यरत होते. तेथून त्‍यांची मार्च 2012 मध्‍ये नळदुर्ग या ठिकाणी बदली करण्‍यात आली होती. दरम्‍यान तीन अधिका-यापैकी एक अधिकारी बेपत्‍ता असून एक अधिकारी आजारी रजेवर आहे. त्‍यामुळे अगोदरच अपुरे कर्मचारी असल्‍याने व त्‍यांचे कार्यक्षेत्र मोठे असल्‍यामुळे उपलब्‍ध असलेल्‍या पोलीस कर्मचा-यानी या ठिकाणी कर्तव्‍य पार पाडत असताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्‍याचबरोबर एका अधिका-याचे पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेसाठी बंदोबस्‍त कामी रवाना करण्‍यात आले होते. त्‍यामुळे नळदुर्ग येथील हे कार्यालय गेले काही दिवस पोलीस अधिकारीविनाच होते. वास्‍तविक पाहता नळदुर्ग पोलीस महामार्ग केंद्रात शासनाने रूग्‍णवाहिका, क्रेन उपलब्‍ध करून पोलीस कर्मचा-यांची संख्‍या वाढविण्‍याची मागणी गेल्‍या अनेक महिन्‍यापासून नागरिकातून होत आहे. मात्र याकडे वरिष्‍ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. सतत महामार्गावर अपघात होत असल्‍याने अपघातग्रस्‍त वाहन रस्‍त्‍यावरुन दूर करून वाहतुक सुरळीत करण्‍यासाठी क्रेनची फार मोठी गरज आहे.
पुढील आठवड्यापासून नागपूर हिवाळी अधिवेशन सुरु होणार असून त्‍याच्‍या बंदोबस्‍तासाठी येथील पोलीस कर्मचा-यांची नेमणूक केली जाते. त्‍यामुळे अधिका-याविना व अपु-या पोलीस कर्मचा-यामुळे महामार्गावर एखादा मोठा अपघात झाल्‍यास अपघातग्रस्तातील जखमीना वेळेवर मदत मिळणार नाही. त्‍याचबरोबर वाहनचालकावर केसेस करण्‍यासाठी पोलीसाना अक्षरशः कार्यालयाला कुलूप ठाकून जावे लागत असल्‍याचे चित्र पहावयास मिळत आहे. या सर्व बाबीचा विचार करुन शासनाने तात्‍काळ याप्रकरणी चौकशी करुन बेपत्‍ता अधिका-याची चौकशी करुन आवश्‍यक ती सोयीसुविधा उपलब्‍ध करुन देण्‍याची मागणी नागरिकातून केली जात आहे.
            दरम्‍यान याप्रकरणी महामार्ग पोलीस पुणे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत माने यांच्‍याशी संपर्क साधले असता पोलीस उपनिरीक्षक के.के. शिंदे गैरहजर असून ते हजर झाल्‍यावर त्‍यांच्‍यावर कारवाई करणार असल्‍याचे सांगून अपुरे कर्मचारी असल्‍यामुळे कार्यालय बंद करुन इतर कामे करावे लागत असल्‍याचे सांगितले. त्‍याचबरोबर नळदुर्ग येथे तीन पोलीस अधिकारी व आठ पोलीस कर्मचारी यांची नियुक्‍ती आहे. यापैकी पोलीस उपनिरीक्षक बारकुल यु.ए. हे दि. 26 नोव्‍हेंबर पासून आजारी रजेवर आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक तांबोळी हे पंढरपूरला बंदोबस्‍तकामी होते. ते शुक्रवार रोजी नळदुर्ग येथे रुजू झाले, असे त्‍यांनी सांगितले.

 
Top