सोलापूर  :- जिल्ह्यातील पाणी टंचाई, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबतची आढावा बैठक राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशिय सभागृहात संपन्न झाली.
    यावेळी माजी उपमुख्यमंत्री आ. विजयसिंह मोहिते पाटील, आ. गणपतराव देशमुख, आ. दिलीप सोपल, आ. भारत भालके. आ. बबनदादा शिंदे, आ. सिद्रमप्पा पाटील, आ. हणुमंत डोळस, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशीगंधा माळी, जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    या बैठकीत जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी ऑक्टोबर 2012 ते जुन 2013 या कालावधीसाठीचा टंचाई निवारणार्थ करावयाच्या नऊ उपाय योजना बाबतचा 74 कोटी 25 लाखांचा आराखडा सादर केला. तसेच जिल्ह्यातील गावनिहाय पाण्याच्या पातळीबाबतही माहिती दिली. यामध्ये सुधारणा सुचविणेबाबत आवाहन करुन सुचविल्यानुसार सुधारणा करण्यात येईल असे सांगितले.
    जिल्ह्यात सद्या 229 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असून 242 विहिर / बोअर अधिग्रहण करण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. टँकरद्वारे पाणी पुरवठा करतांना तफावत आढळल्यास पैसे कमी करुन त्यांना काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) करावे अशी चर्चा बैठकीत झाली. त्याचप्रमाणे जनावरांच्या छावण्यात बोगस जनावरे आढळल्यास नोटीस देऊन खुलासा मागवावा. तसेच अशा प्रकारचा गैरप्रकार करणा-यांना जरब बसवावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
    जिल्हृयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी 53 कोटी 60 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तालुकानिहाय मजूर उपस्थिती व मागणीनुसार निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार यांनी दिली.
    या योजनेवर काम करणा-या मजूरांना वेतन वेळेवर मिळत नसल्याबद्दल उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी विचारणा केली याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात यावी तसेच तहसिलदार व गटविकास अधिका-यांनी विशेष लक्ष घालावे अन्यथा यापुढे जबाबदारी निश्चित करुन कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मवारे यांनी सांगितले.
 
Top