नळदुर्ग -: उस्‍मानाबाद जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेची नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्‍याकडे सुमारे 48.31 कोटी थकबाकी असल्‍याने जिल्‍हा बँकेच्‍या विशेष पथकाने शुक्रवार दि. 7 डिसेंबर रोजी कारखान्‍यावर जप्‍तीच्‍या कारवाईसाठी तयारीनिशी आले असता त्‍यास कारखान्‍याच्‍या कार्यकारी संचालकाने विरोध करून व हरकत घेऊन येत्‍या 20 डिसेंबरपर्यंत तुळजाभवानी कारखाना एक रकमी रक्‍कम भरणा करणार असल्‍याचे निवेदन बँकेच्‍या पथकास दिल्‍याने तुळजाभवानी वरील जप्‍तीची कारवाई तुर्त टळली आहे, असे बँकेच्‍या पथकाचे आर.के. जोशी यांनी सांगितले. दरम्‍यान जप्‍तीच्‍या कारवाईसाठी आलेल्‍या पथकास हात हलवत जावे लागले.
       नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना तुळजापूर तालुक्‍यातील शेतक-यांच्‍या विकासाचा केंद्रबिंदू मानले जात असून संचालक मंडळाच्‍या नियोजन शून्‍य कारभारामुळे हा कारखाना गेल्‍या काही वर्षापासून कर्जाच्‍या विळख्‍यात सापडला. जिल्‍हा बँकेचे तुळजाभवानी कारखान्‍याकडे आजअखेर 48.31 कोटी रुपये थकबाकी असल्‍याचे सांगून सातत्‍याने थकबाकी बँकेस भरणा करावी, म्‍हणून सूचना व नोटीस देवूनही त्‍याकडे दूर्लक्ष केल्‍याने दि. 7 डिसेंबर रोजी तुळजाभवानी कारखान्‍याकडे असलेली थकबाकी वसूल करण्‍यासाठी सर्फसी अॅक्‍ट अंतर्गत केंद्र शासनाच्‍या योजनांतर्गत जप्‍तीची कारवाई करण्‍यासाठी बँकेचे प्राधिकृत अधिकारी आर.के. जोशी यांच्‍यासह प्रशासन अधिकारी ए.एन. ढेंगळे, तपासणी अधिकारी प्रकाश जगदाळे, वसुली अधिकारी यु.बी. माने, आर.डी. मोरे, एन.डी. साळुंखे, एस.बी. पाटील व तुळजापूर तालुक्‍यातील बँकेचे कर्मचारी तुळजाभवानी कारखान्‍यावर आले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक विकास भोसले व कर्मचा-यांनी जप्‍तीच्‍या कारवाईस विरोध दर्शवून व हरकत घेऊन बँकेच्‍या पथकास तुळजाभवानी साखर कारखान्‍यावतीने लेखी निवेदन दिले आहे. येत्‍या 20 डिसेंबर पर्यंत बँकेची देय असलेली रक्‍कम तुळजाभवानी कारखाना एक मुस्‍त रक्‍कम भरण्‍यास करीत आहे. याबाबत 20 डिसेंबर पर्यंत त्‍याबाबतचा प्रस्‍ताव मान्‍यतेसाठी बँकेकडे पाठविण्‍यात येणार असून एक मुस्‍त रक्‍कम भरणा करणार असल्‍याचे लेखी निवेदन दिल्‍याने तुळजाभवानीवरील शुक्रवार रोजी जप्‍तीची होणारी कारवाई तुर्त टळली आहे, असे बोलताना बँकचे प्राधिकृत अधिकारी आर.के. जोशी यांनी सांगितले. दरम्‍यान याप्रकरणी प्रभारी कार्यकारी संचालक यांच्‍याशी संपर्क साधले असता, बँकेचे मुद्दल 47 कोटी व व्‍याज 30 कोटी असे मिळून 78 कोटी रूपये कारखाना देणे असून थकबाकी पुर्नगठित करून बँकेने द्यावी, याकरीता 20 डिसेंबर अखेरपर्यंत प्रस्‍ताव बँकेकडे देणार असून कारखाना व बँक या दोन्‍ही संस्‍थांचे व्‍यवहार सुरळीतपणे चालण्‍यासाठी पर्यायी मार्ग बँकेने काढावे, यासाठी लेखी निवेदन दिल्‍याचे सांगितले.
 
Top