मुंबई -: मास्‍टर ब्‍लास्‍टर विक्रमादित्‍य सचिन तेंडुलकरने एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. हा निर्णय सचिनसाठी अतिशय अवघड होता. सचिनला आणखी काही काळ खेळायचे होते. परंतु, सततच्‍या टीकेमुळे व्‍यथित होऊन सचिनने निवृत्तीचा निर्णय घेतला, असे त्‍याच्‍या निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धावा काढता न आल्याने व सततच्या टीकेमुळे निराश झालेला सचिन नागपूर कसोटीनंतर एकांतात गेला होता. त्याने आपला मोबाईल फोनही बंद करुन ठेवला होता. त्याच्याशी संपर्क साधायचा म्हटले तरी त्याची पत्नी अंजलीला फोन करावा लागत असे, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.  सचिन ख्रिसमस साजरा करण्यासाठी पत्नी अंजलीसह मसुरीत दाखल झाला असून, त्याने निवृत्तीबाबत बोलण्यास पत्रकारांना नकार दिला आहे. 
    अखेर सचिनने बीसीसीआयला निर्णय कळविला. त्‍यावेळी बीसीसीआयने सचिनला फेरविचार करावा, असे सांगितले होते. सचिनने पाकिस्‍तानविरुद्ध मालिकेत खेळावे, अशी इच्‍छा बीसीसीआयने व्‍यक्त केली होती. विशेषत बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन व निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनीही सचिनने पाकविरुद्धची मालिका खेळावी, असे सुचवले होते. मात्र, निवड समितीतील इतर सदस्य त्यासाठी तयार नव्हते. त्यामुळे बोर्ड व निवड समितीचे अध्यक्ष खेळ म्हणत असतानाही इतर सदस्यांचे मत लक्षात घेत सचिन आपल्या निर्णयावर ठाम राहिला.
       सचिनच्‍या निवृत्तीमुळे वन डे क्रिकेटमधील एका युगाचा अस्‍त झाला. सचिनचा निवृत्तीचा निर्णय सर्वांसाठी आश्‍चर्याचा धक्‍काच होता. यावर सर्व प्रकारच्‍या प्रतिक्रीया उमटत आहेत. परंतु, स्‍वतः सचिनसाठी हा निर्णय अतिशय अवघड होता. निर्णय कळविण्‍यापूर्वी तो कालची संपूर्ण रात्र जागा होता. एका क्षणासाठीही त्‍याला झोप लागली नव्‍हती, असे त्‍याच्‍या निकटवर्तीयांनी सांगितले. त्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सचिन गेल्‍या महिनाभरापासून त्‍याचा मोठा भाऊ अजित, पत्नी अंजली आणि त्‍याच्‍या प्रशिक्षकांशी चर्चा करीत होता.

* सौजन्‍य दिव्‍य मराठी
 
 
Top