2012 या सरत्‍या वर्षात अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्‍याने उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात मोठ्याप्रमाणावर राजकीय उल‍थापालथी झाल्‍या. तर प्रचंड महागाईने सर्वसामान्‍य जनतेचे कंबरडे मोडले असतानाच पाणीटंचाई, ऊसाच्‍या व दुष्‍काळाच्‍या प्रश्‍नावरुन सर्वत्र रास्‍ता रोको आंदोलन, मोर्चा, नळदुर्ग जवळील सर्वात मोठा भीषण अपघातात 31 ठार, मुख्‍यमंत्र्यासह प.पू. श्री.श्री. रविशंकर गुरूजी यांच्‍यासह अनेक दिग्‍गजांनी उस्‍मानाबाद जिल्‍हा ढवळून काढले, तर कुशल प्रशासक व कर्तव्‍यदक्ष म्‍हणून लोकप्रियता मिळविलेल्‍या जिल्‍हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांची बदली, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार शिवाजीराव पाटील बाभळगावकर यांचे दुःखद निधन, आम्‍ही वृत्‍तपत्राच्‍या माध्‍यमातून नंदगाव जळीतग्रस्‍तप्रकरणी वाचा फोडल्‍याने तहसिलदारांसह तलाठी, सरपंच दोषी आढळल्‍याचे अहवाल, त्‍याचबरोबर बालगृह चालविणा-या संस्‍थेतील गैरकारभाराचा पर्दाफाश केल्‍याने मराठ्यातील 52 बालगृहांची मान्‍यता शासनाने रद्द केली. या व इतर घटनांनी सरते वर्ष गाजले आहे.
    विविध घटनांनी 2012 हे वर्ष गाजले. शहर व परिसरातील अनेक प्रश्‍नांवर आमच्‍या वृत्‍तपत्रातून प्रकाशझोत टाकून पर्दाफाश केला. त्‍यापैकीच मराठवाड्यातील 52 बालगृहांची मान्‍यता रद्द झाल्‍याने संस्‍थाचालकांचे धाबे दणाणले, नंदगाव जळीतग्रस्‍त प्रकरण धसास लावल्‍याने अखेर याप्रकरणी तहसिलदार हे दोषी असून त्‍यांच्‍यावर योग्‍य ती कारवाई करावी व याप्रकरणामध्‍ये मदत करणारे तलाठी, सरपंच यांची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, असे उपविभागीय अधिकारी यांनी जिल्‍हाधिकारी यांना सादर केलेल्‍या अहवालात म्‍हटले आहे. त्‍यामुळे सर्वसामान्‍य नागरिकांतून आमचे अभिनंदन होत आहे. मराठवाड्याच्‍या आजवरच्‍या इतिहासात सोलापूर-हैदराबाद राष्‍ट्रीय महामार्गावर मुर्टा (ता. तुळजापूर) पाटीजवळ दि. 16 जून रोजी पहाटे बस पुलावरून कोसळून 31 भाविक प्रवाशी ठार तर 16 जण गंभीर जखमी झाल्‍याची दुर्दैवी घटना घडली. ही बस हैद्राबादहून शिर्डीकडे जात होती. त्‍यानंतर महामार्गावरील अनेक समस्‍या उघडकीस आले. त्‍यावर सुस्‍त प्रशासनाने काटेकोरपणे उपाययोजना करणे गरजेचे असताना काही ठिकाणी थातुरमातुर कामे करुन आपली जबाबदारी झटकल्‍याचे दिसून आले. त्‍यानंतरही अपघाताची मालिका महामार्गावर सुरुच आहे.
    नळदुर्ग येथिल आलियाबाद घाटात दि. 13 जानेवारी रोजी आराम बस व कंटेनेरच्‍या आपघातात पाचजण ठार झाले. तर 25 जण जखमी झाले. दि. 2 फेबुवारी रोजी झालेल्‍या उस्‍मानाबादजवळ दोन वेगवेगळ्या अपघातात 6 ठार, 7 जखमी झाले. दि. 3 फेब्रुवारी रोजी मालट्रक व नवीन ट्रक चेसी यांच्‍यापत झालेल्‍या अपघातात चेसी चालक महमद जिलानी मकबल हा ठार झाला, तर सहाजण जखमी झाले. हा अपघात मुर्टा (ता. तुळजापूर) पाटीजवळ झाला. नळदुर्गजवळ दिल्‍ली दरबार हॉटेलजवळ ट्रक झाडावर आदळून 9 जागीच ठार झाले तर 10 जण जखमी झाले. ही घटना दि. 5 फेब्रुवारी रोजी घडली.  परांडा शहराजवळ दि. 13 फेबुवारी रोजी दोन ट्रकच्‍या आपघातात दोघे ठार झाले.  तुळजापूर-सोलापूर रोडवरील घाटशीळ घाटात बुधवार दि. 8 ऑगस्‍ट रोजी पहाटे टँकरवर ट्रक आदळून सुरेश भुजंग कांबळे (रा. काटकळंब, ता. कंधार, जि. नांदेड) हा मरण पावला. नळदुर्ग येथील तुळजाभवानी साखर कारखान्‍यासमोर दि. 19 सप्‍टेंबर रोजी आठ वाजता भरधाव वेगाने जाणा-या फियाट कारने झुंबर नागनाथ गायकवाड (वय 60) यास धडक दिल्‍याने तो गंभीर जखमी होऊन नोव्‍हेंबरमध्‍ये मरण पावला. या अपघातग्रस्‍त कारमध्‍ये 150 किलो गांजा आढळला. दि. 29 मे रोजी जळकोट (ता. तुळजापूर) शिवारात धावत्‍या ट्रकवर वीज पडून ट्रक जळून खाक झाले. दि. 2 नोव्‍हेंबर रोजी उस्‍मानाबादचे वरिष्‍ठ भूवैज्ञानिक संजय लक्ष्‍मण भोगे (रा. जळकोट, ता. तुळजापूर) यांचे मोटार अपघातात निधन झाले. दि. 16 नोव्‍हेंबर रोजी अणदूर (ता. तुळजापूर) येथील बसस्‍थानकासमोर ट्रक व मोटारसायकलच्‍या अपघातात किरण शिवाजी आरगे (वय 19 वर्षे) व अतुल शिवाजी मुळे (वय 19 वर्षे) दोघे रा. चिवरी, ता. तुळजापूर हे दोघे युवक जागीच ठार झाले.
        पांगधरवाडी (ता. तुळजापूर) येथे दि. 12 ऑगस्‍ट रोजी एकतर्फी प्रेमातून मनीषा राजाराम जाधव (वय 18) या युवतीने आत्‍महत्‍या केली. याप्रकरणी राजाराम ऊर्फ राजेंद्र जाधव यांनी तामलवाडी पोलीसात फिर्याद दिल्‍याने  सतीश मते याच्‍याविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. तर दि. 20 ऑगस्‍ट रोजी सोलापूर जिल्‍ह्यातील मुळेगावाहून गावठी हातभट्टी दारू वाहतुक करीत असताना नळदुर्ग बसस्‍थानकासमोर पोलीसानी लक्ष्‍मण धनू चव्‍हाण यास ताब्‍यात घेऊन जीपसह 2 लाख 12 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्‍त केला.
        आपसिंगा (ता. तुळजापूर) येथे खरेदी केलेल्‍या शेतामधील खोदलेल्‍या विहिरीच्‍या हिशोबाची फेरफार रजिस्‍टरवर नोंद घेण्‍यासाठी एक हजार रूपयाची लाच घेताना आपसिंगा सज्‍जाचे तलाठी शिवलिंग लक्ष्‍मणराव गंठोड यांना लाच घेताना पकडण्‍यात आली. सिंदफळ (ता. तुळजापूर) येथील सिंमेट रस्‍ते व शौचालयाच्‍या कामात दीड लाखाचा अपहार केल्‍याप्रकरणी तत्‍कालीन सरपंच सुभाष व्‍यवहार व ग्रामसेवक ए.आर. तुपेरे यांच्‍याविरूद्ध विस्‍ताराधिकारी संजय राऊत यांच्‍या फिर्यादीवरून दि. 19 मे रोजी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. सातबारा फेरफार करण्‍यासाठी 8 हजाराची लाच स्‍वीकारणा-या डोंजा (ता. परंडा) येथील तलाठी मधुकर ठोसर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या पथकाने एप्रिलच्‍या पहिल्‍या आठवड्यात रंगेहाथ पकडले. एप्रिल महिन्‍याच्‍या अखेरीस उस्‍मानाबाद जिल्‍हापरिषद शिक्षण विभागाच्‍या वरिष्‍ठ लिपीक गुणवंत साळवे पाच हजार रूपयेची लाच घेताना लाचलुचपत प्रति‍बंधक खात्‍याच्‍या पोलीसानी रंगेहाथ पकडले. श्री तुळजाभवानी देवीस अर्पण केलेल्‍या सोन्‍याच्‍या दागिन्‍याची पावती देण्‍यास विलंब लावून संशयस्‍पद वर्तवणूक केल्‍याप्रकरणी युवराज साठे या लिपिकास निलंबित करण्‍याचे आदेश जिल्‍हाधिकारी डॉ.के.एम. नागरगोजे यांनी दिले. ही घटना ऑक्‍टोबर महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यात घडली. जुलै महिन्‍याच्‍या अखेरीस हवालदार जगन्‍नाथ बेंद्रे यांनी बळीराम विठोबा वाघमारे या अंध व्‍यक्‍तीकडून पाच हजाराची लाच घेतल्‍याप्रकरणी न्‍यायालयाने दोन वर्षे सक्‍तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
 
Top