बार्शी (मल्लिकार्जून धारूरकर) -: येथील वीरभद्र देवस्‍थान, माढेकर मठातील प्रथा परंपरेनुसार प्रतिवर्षाप्रमाणे प्रभुदेव शिवाचार्य गुरू, कांतेश्‍वर शिवाचार्य माढेकर महाराज यांच्‍या प्रमुख उपस्थितीत वीरभद्र जन्‍मोत्‍सवात शिवदिक्षा, अ‍ग्निपोवाडा, विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्‍साहात पार पाडण्‍यात आले.
       दि. 9 ते 14 डिसेंबर दरम्‍यान झालेल्‍या धार्मिक कार्यक्रमात वीरभद्र कंकन बांधणे, तेल लावणे, वाती (घट) बसवणे, शिवदिक्षा, पंचमुखी महादेवास व गुरू समाधिस रूद्राभिषेक, गादी पूजन (वीडा भरणे), पालखीतून सवाद्य मिरवणूक, अग्‍नीकुंड प्रज्‍वलित करणे, रूद्राभिषेक अग्निशांती, अग्निकुंडात प्रवेश, महामंगल आरती (फुले उधळणे) व महाप्रसाद, भजन आदी कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात साजरे करण्‍यात आले.
       अग्निपोवाड्याच्‍या कार्यक्रमासाठी खास कर्नाटकातून शिवशरणाप्‍पा पुरवंत अट्टरगाव, बसवकल्‍याण, प्रभुलिंग वीरभद्र पुरवंत, इल्‍लाळ, लक्ष्‍मीकांत वीरभद्र पुरवंत, नावदगी (ता. आळंद) गुलबर्गा या तीन पुरवंतांच्‍या प्रमुख उपस्थितीत वीरभद्र देवतांची शस्‍त्रास्‍त्रे टोचण्‍याचा कार्यक्रम कर्नाटकातील रितीरिवाजानुसार पार पाडण्‍यात आला. गुरूवारी सायंकाळी शहरातील नियोजित मार्गावरून वीरभद्राची पालखी निघाल्‍यावर पालखीबरोबर वीरभद्राचा अवतार धारण केलेल्‍या पुरवंतांनी शस्‍त्र अज्ञेचण्‍याचा व शरीरातून 108 फूट दोरी टोचून बाहेर काढण्‍याचा कार्यक्रम करत मंदिरापर्यंत भक्तिमय वातावरण निर्माण केले. ठिकठिकाणी त्‍यांचा धार्मिक कार्यक्रम पाहण्‍यासाठी मोठी गर्दी झाली होती.
     पूर्वापार चालत आलेल्‍या परंपरेला मधल्‍या काळात खंड पडल्‍यानंतर माढेकर मठाच्‍या गादीवर कोणत्‍याही पिठाधिका-यांची निवड होत नसल्‍याने मठाच्‍या ठिकाणी दूर्लक्ष झाले होते. मागील चार ते पाच वर्षापूर्वी नूतन माढेकर महाराजांचा पट्टाभिषेक सोहळा झाल्‍यानंतर त्‍या मठाला चेतना मिळाली आहे. दुर्लक्षीत झालेल्‍या मठाची दुरावस्‍था झाल्‍याने त्‍यांची चांगल्‍या प्रकारे नियोजन करून मठाचे पुनरूज्‍जीवन करण्‍यास सुरुवात केली आहे.
 
Top