उस्मानाबाद : शहरातील प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा हिवताप कार्यालयात जिल्हा आरोग्य अधिका-याला त्यांच्या कार्यालयातील आरोग्य सेवकांने पैसे मागून मारहाण केल्याची घटना दि. 14 डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी पोलीसात एकाविरूद्घ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरीशचंद अंबादास कडगंची असे मारहाण केलेल्या जिल्ह्याचे हिवताप आरोग्य अधिका-याचे नाव आहे. तर तुकाराम चंद्रसेन खोत (रा. गोवर्धनवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या सेवकाचे नाव आहे. यातील कडगंची हे आपल्या प्रशासकीय इमारतीमधील कार्यालयामध्ये नेहमीप्रमाणे कामकाज करीत असताना त्यांच्या कार्यालयातील आरोग्य सेवक पदावर कार्यरत असलेले तुकाराम खोत हे त्यांच्या दालनात आले व त्यांनी आरोग्य अधिकारी कडगंची यांना मी मराठवाडा आरोग्य विभाग कर्मचारी संघटना इंटर इंडीयन ट्रेडीशनल काँग्रेस (सलग्न) या संघटनेचा अध्यक्ष असून आमच्या संघटनेसाठी तुम्हाला दरमहीन्याला १ हजार रुपये व वर्षाला बारा हजार रुपये द्यावेच लागतील असे म्हणुन पैशाची मागणी केली. यावेळी अरोग्य अधिका-यांनी सदरची रक्कम देण्यास नकार दिला असता अरोग्य अधिकारी कडगंची यांना शिवीगाळ करुन मारहाण व धक्काबुक्की केली. व जर आमच्या संघटनेसाठी निधी दिला नाही तर तुला खुर्ची सोडावी लागेल व तुला बघुन घेईन असे म्हणुन धमकी दिली. यावेळी या दोघामध्ये चाललेला वाद कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक शेळके हे सोडवण्यासाठी आले असता अरोपी खोत याने शेळके यांनाही शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. सदरील घटनेची फिर्याद जिल्हा आरोग्य अधिकारी कडगंची यांनी शहर पोलीस ठाण्यात दिल्याने आरोपी तुकाराम खोत यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोकॉ पवार हे करीत आहेत.