तुळजापूर -: जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करुन त्या जमिनीवर ८ लाख रुपयांचे कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी एका समाजसेवकास सपत्नीक न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
राजा माने,उमा राजा माने असे न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आरोपींचे नाव आहेत. यातील दोघांनी संगनमत करून भगवान बापूराव बर्वे (रा.तुळजापूर) यांची जमीन (सिटी सर्वे क्र. २६६६/३/४) दुय्यम निबंधक कार्यालयातून खोटे दस्तावेज तयार करुन तो दस्तावेज वापरत हैदराबाद शाखा तुळजापूरकडे दाखल करुन त्याआधारे सुमारे आठ लाख रुपयांचे कर्ज उचलले. आरोपी माने हे जमिनीचे मालक नसतानाही खोटी कागदपत्रे तयार करुन स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर करुन फिर्यादी व बँकेला ठकिवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणावरुन तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी माने यांना तुळजापूर न्यायालयात हजर केले असता त्यांचा जामीन अर्ज फेटाळत न्यायालयीन कोठडी सुनावली. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे हे करीत आहेत.