नागपूर :  भारतीय लोकशाही ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. भारतीय समाज रचनेतील शेवटच्या माणसालाही समान अधिकार प्रदान करणारी डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना ही या लोकशाहीचे महाकाव्य आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी केले. विधान परिषदेच्या सभागृहात 42 व्या राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गात मार्गदर्शन करताना प्रा. पुरके बोलत होते.
     “संसदीय लोकशाहीमध्ये लोकशिक्षणाचे महत्व” या विषयावर प्रा. पुरके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. पुरके यांनी भारतीय समाजातील लोकशाही मुल्यांच्या इतिहासाबाबत मांडणी केली. ते म्हणाले, भारतात लोकशाही परंपरेचे मुल्य पूर्वी पासून रुजविण्याचा प्रयत्न झाला. अध्यात्मातुन ही मुल्ये रुजविण्याचा प्रयत्न संतांनी केला. त्यासाठी त्यांनी लोकशिक्षणालाच महत्व दिले होते. लोकांमध्ये सद्सद् विवेक बुध्दी निर्माण करणे हाच या लोकशिक्षणाचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम निवडले होते. रंजन आणि प्रबोधन मुल्यांचा अवलंब करीत हे लोकशिक्षण अधिक प्रभावी ठरले, असे त्यांनी सांगितले.
     सध्याच्या काळात भारतीय संविधानाबाबत त्यात मांडलेल्या समानतेच्या मुल्यांबाबत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत जनसामान्यांना माहिती देणे आवश्यक आहे. विधिमंडळासाठी सभागृहे ही जर लोकशाहीची मंदिरे असतील तर लोक हे दैवत आहेत. प्रगल्भ लोकशाहीसाठी लोकांमध्ये विज्ञानदृष्टीचा प्रसार होणे आवश्यक आहे. त्यासाठी राजकारणात युवकांनी येणे गरजेचे आहे. राजकारणावर टीका करण्यापेक्षा राजकारणात या, असे आवाहनही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
     प्रारंभी प्रा. पुरके यांचे स्वागत आणि परिचय आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी करुन दिला. आभार प्रदर्शनानंतर जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
 
Top