नागपूर :  संसदीय लोकशाही पध्दतीमध्ये सक्रिय विरोधीपक्षांमुळे अनेक विधायक गोष्टी घडून येतात. निव्वळ विरोधासाठी विरोध अशी भूमिका कधीच नसते, असे मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मांडले. विधानपरिषद सभागृहात आयोजित 42 व्या राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गातील ‘संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाचे स्थान आणि कार्य’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
       तावडे पुढे म्हणाले, लोकशाहीत विरोधी पक्षांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचे काम विरोधी पक्षामार्फत केले जाते. या विरोधामागे व्यापक जनहिताचीच विधायक भूमिका असते. अनेक विषयांवर विरोधी पक्ष अभ्यासपूर्ण भूमिका मांडत असतो. त्याची शासनाला निश्चितच दखल घ्यावी लागते.
      सभागृहातील गोंधळामुळे बंद पडणारे कामकाज आणि होणारे आर्थिक नुकसान या विषयीही श्री. तावडे यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, कामकाज बंद पडल्यामुळे अनेकदा आर्थिक नुकसान होते हे खरे असले तरी त्यातून निर्माण होणाऱ्या दबावामुळे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळते. हा आर्थिक फायदा होणाऱ्या नुकसानीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असतो. राजकिय क्षेत्र आव्हानात्मक असून भविष्यात तरुणांनी मोठ्या प्रमाणात या क्षेत्राकडे वळायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.
      प्रारंभी विधानपरिषद सदस्य अॅड. आशिष शेलार यांनी विनोद तावडे यांचा परिचय करुन दिला, तर रक्षा पाटोळे या विद्यार्थिनीने आभार मानले.
 
Top