नळदुर्ग -: राष्‍ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे गांजाची चोरटी वाहतूक करणा-या दोघाना गस्‍ती पोलीसानी सुमारे 74 हजार रूपये किंमतीच्‍या 37 किलो गांजासह पकडून गजाआड केले. ही घटना शिरगापूर (ता. तुळजापूर) येथे मंगळवार रोजी पहाटेपूर्वी घडली आहे.
         राकेश राजू पुजारी (वय 20 वर्षे, रा. चेंबूर मुंबई), गौतम पंडित भुतूडे (वय 20 वर्षे, रा. मुंबई) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींचे नावे आहेत. यातील राकेश व गौतम यानी आंध्रप्रदेशातील जहिराबादहून मुंबईकडे तीन कापडी बॅगमध्ये ३७ किलो गांजा घेऊन जात असताना मंगळवार पहाटेपूर्वी दीड वाजण्याच्या सुमारास शिरगापूर पाटीवर उतरले होते. यावेळी गस्‍तीवर असलेले पोलिस बजरंग सरपाळे, संजय शिंदे यांना पाटीवर बंद पडलेला ट्रक दिसला. वाहतूक एकेरी का होत आहे, याचा अंदाज घेण्यासाठी पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांना शिरगापूर पाटीवर उतरलेले दोन युवक संशयास्पदरीत्या उभारलेले आढळून आले. पोलिसी खाक्या दाखविताच राकेश आणि गौतम याने गांजा घेऊन मुंबईला जात असल्याचे सांगितले. गांजा देणारी व्यक्ती आम्हाला येथे उतरण्यास सांगितल्यामुळे आपण येथे थांबल्याचे त्यांनी सांगितले. सकाळपर्यंत पोलिसांनी त्या युवकांना कोण भेटायला येतो का याची वाट पाहिली. मात्र कोणीही त्‍यांना भेटायला आले नाही. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार व नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. या घटनेची हवालदार बजरंग सरपाळे यांनी फिर्याद दिल्‍यावरून नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर हे करीत आहेत.
 
Top