उस्‍मानाबाद -: पाणीटंचाईच्‍या झळा उन्‍हाळा येण्‍यापूर्वी हिवाळ्यातच जाणवू लागल्‍याने उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील आठ तालुक्‍यापैकी सात तालुक्‍यातील ग्रामीण भागात 41 तर नागरी भागात 53 असे मिळून 94 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्‍यात येत आहे. पिण्‍याच्‍या पाण्‍याची परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात पाणी रौद्ररूप धारण करणार असल्‍याचे चिन्‍ह दिसत असून आजही जिल्‍ह्यातील काही भागात उपलब्‍ध असलेल्‍या पाणीसाठ्यातून पाणी उपसा केला जात आहे. याप्रकरणी तात्‍काळ उपाययोजना करणे गरजेचे असून दोषीविरूद्ध कडक कारवाई करण्‍याची मागणी नागरिकातून केली जात आहे.
         जिल्‍ह्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा टँकर्सपैकी सर्वात जास्‍त भूम तालुक्‍यातील पंधरा गावे व वाड्यासाठी १४ टँकर सुरू आहेत. त्‍याचबरोबर कळंब तालुक्यात ११ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून, यात आठ गावांचा समावेश आहे. उस्मानाबाद तालुक्यातील ५ गावांमध्ये ५ टँकरद्वारे, तुळजापूर तालुक्यात ३, उमरगा ३, वाशी तालुक्यात ४ तर परंडा तालुक्यातील एका गावामध्ये टँकरने पाणी पुरविले जात आहे. लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागात सद्यस्थितीत एकही टँकर सुरू नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. जिल्ह्यातील २५२ गावे व २५ वाडयांवर मोठया प्रमाणात पाणीटंचाई जाणवत असून, यासाठी प्रशासनाच्या वतीने ५४१ विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याशिवाय ग्रामीण भागात ४१ तर नागरी भागात ५३ अशा एकूण ९४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.  जिल्हयातील विहिरी, तलाव, बोअर, कुपनलिका या जवळपास कोरडया पडल्या आहेत. लहान व मोठय़ा प्रकल्पातील पाणीसाठाही जवळपास संपत आल्याने येणार्‍या काळात टँकरमध्ये पाणी भरायचे कोठून, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण होत आहे.
 
Top