नळदुर्ग -: काटी (ता. तुळजापूर) गावाला पाणीपुरवठा करणा-या विहिरीतील पाणी पातळीत लक्षणीय घट होत असून त्‍यामुळे पाणीटंचाईचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्‍याकरीता जवळगाव प्रकल्‍पातील पाणी उपसा त्‍वरीत थांबवावा, असा एकमुखी ठराव ग्रामपंचायतीने घेऊन ते ग्रामसभेत मंजूर करण्‍यात आला आहे. त्‍याचबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने जवळगाव प्रकल्पामध्ये एक नवीन विहीर खोदण्यास मंजुरी मिळावी, याबाबत चर्चा झाली. शासन स्तरावर गावच्या पाण्याची समस्या मांडण्याचा प्रयत्‍न करु, असे आश्‍वासन सरपंच गीता जाधव यांनी यावेळी दिले.
        जवळगाव प्रकल्पातील पाणी उपसा त्वरित थांबवावा, असा ठराव सरपंच गीता अशोक जाधव यांनी मांडून त्यास ग्रामपंचायत सदस्यांसह गावकर्‍यांनी सोमवारी ग्रामसभेमध्ये मंजूर केला. काटी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायतीच्या वतीने पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासंदर्भात ग्रामसभेचे आयोजन केले होते. सरपंच गीता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेस सुरुवात होवून गावामध्ये असणारी पाणीटंचाई, जवळगाव प्रकल्पातून होणारा पाण्याचा उपसा व त्यामुळे तलावातील पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीजवळील पाणी खालावू लागल्याने काटी गावाला पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे.
       याप्रसंगी उपसरपंच अरविंद ढगे, माजी सरपंच विक्रमसिंह देशमुख, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा काळे, करीम बेग, हारुण शेख, वसीम कुरेशी यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
 
Top