नाशिक -: घरातून नाशिकपर्यंत आलो, मात्र काही वेगळे वाटले नाही; परंतु तुमच्यात आल्यानंतर कुटुंबात आल्यागत भारावून, हेलावून गेलो. कोणी म्हटले की आता शिवसेना कमकुवत झाली. परंतु अजून आमचा पक्ष कमकुवत झालेला नाही. शिवसैनिकांच्या टॉनिकवरच शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्व व देशासाठी लढा दिला जाईल. त्याच जोरावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने पूर्ण केली जातील, असे भावनिक आवाहन शिवसेना कार्यकारीप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले.
           महाकवी कालिदास कलामंदिरात उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आज भाषण करायलो आलो नाही. माझा दौराही राजकीय नाही. जानेवारीपासून राज्यभरात फिरणार आहे. राजकारण करण्यासाठी जन्म बाकी आहे. आता मात्र तुमच्यापुढे नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. बाळासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेकांची इच्छा होती. अभूतपूर्व जनसागर जमला होता. या सर्वांना भेटण्यासाठी आलो.
              अनेक वेळा तलवारी उपसल्या, मात्र तलवार कधी म्यान करायची आणि चढाई कधी करायची याचे भान ठेवायचे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिवाची पर्वा करणार नाही.

वाघ कधी होणार ?
नुसत्या वाघासारख्या घोषणा देतात. मात्र, वाघ कधी होणार ? बाळासाहेब नेहमीच म्हणत असत. लाखो दिवस भेकडासारखे जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा.

उत्तर प्रदेशाला कळाली ताकद - साहेबांची ताकद ‘यूपी’च्या लोकांना माहीत आहे. अमरनाथ यात्रा होऊ देणार नाही, अशी धमकी दहशतवाद्यांनी दिली. त्यानंतर बाळासाहेबांनी मुंबईतून हज यात्रेला जाऊ दिले जाणार नाही, असे प्रतिआव्हान दिल्यानंतर दहशतवादी नमल्याची आठवण एका उत्तर भारतीयाने या वेळी दिली.

बाळासाहेब तुमच्यातच -
कोण म्हणते बाळासाहेब आपल्यात नाही. बाळासाहेब प्रत्येक शिवसैनिकात आहे. बाळासाहेब ही मोठी शक्ती आहे.

आम्ही चालवू यापुढे वारसा - मध्यंतरी माझ्यावर दोनदा अँजिओप्लास्टी झाली. काही जण म्हणाले, प्रकृती सांभाळा.. मात्र त्यापेक्षा हिंदुस्थान व महाराष्ट्राची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. बाळासाहेबांनी हीच शिकवण देत शेवटपर्यंत महाराष्ट्र व देशासाठी काम केले. शिवसेनाप्रमुख म्हणून अखेरपर्यंत बाळासाहेबच राहतील. दुसरा शिवसेनाप्रमुख होणार नाही, असा पुनरुच्चारही उद्धव यांनी केला. बाळासाहेबांच्या कार्याचा वारसा स्वत: शिवसैनिक पुढे नेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बाळासाहेबांचे रक्त माझ्या धमन्यात आहे, संकटाचा चक्रव्यूह भेदून पुढे जाण्याची ताकदही आहे. त्यामुळे रडत बसू नका. ‘बाळासाहेब परत या’ असे तुम्हीच म्हणतात ना. मग ते परत आले तर तुमची अवस्था बघून व्यथित होतील. रडू नका तर लढा. हिंदुत्वासाठी, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसैनिकांनी भरारी घ्यावी, अशी साद उद्धव ठाकरे यांनी घातली.
 
Top