मुंबई -: रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांची संख्या वाढतच असून या अपघातांबाबत जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्यातून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी 1 ते 15 जानेवारी 2013 या कालावधीत राबविण्यात येणारे रस्ता सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केले.
    रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात आज, मंत्रालयात गृहमंत्री पाटील यांनी वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेऊन अभियानाच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर, परिवहनप्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा, वित्त विभागाचे प्रधान सचिव एस.के.श्रीवास्तव, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विजय कांबळे, परिवहन आयुक्त मोरे, सह पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी अधिकारी उपस्थित होते.
       यावेळी गृहमंत्री  पाटील म्हणाले की, अमेरिका, चीनपेक्षा भारतात अपघातांची आणि त्यातील मृतांची संख्या जास्त आहे. ही संख्या कमी करायची असेल तर वाहनचालकांबरोबरच सामान्य जनतेमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. देशात 1 ते 7 जानेवारीदरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह होत असला तरी महाराष्ट्रात मात्र आपण पंधरवडाभर हे अभियान राबवतो.  संपूर्ण राज्यात रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी परिवहन, पोलीस, शिक्षण, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसी या विभागांनी सामूहिक प्रयत्न करुन हे अभियान यशस्वी करण्यासाठी सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे यांचे सहकार्य घेण्याचे आवाहन यावेळी गृहमंत्र्यांनी केले.
       प्रारंभी अपर पोलीस महासंचालक विजय कांबळे यांनी सादरीकरण करुन महामार्ग पोलीसांच्या वतीने रस्ता सुरक्षेच्या सुरु असलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली. बैठकीस  गृह, पोलीस, वित्त, परिवहन  विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रस्ता अपघातांचे वास्तव...
*   जागतिक आकडेवारी पाहता जगात प्रत्येक तासाला 25 वर्षे वा त्यापेक्षा कमी वयोगटातील 40 व्यक्ती ह्या अपघातात मरण पावतात असे एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे.

*    राष्ट्रीय गुन्हे अभिलेखातील आकडेवारीनुसार, भारतात सन 2011 मध्ये 4,40,123 अपघात घडले तर त्यात 1,36,834 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असून 4,70,687 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत.

*    महाराष्ट्रात 2011 मध्ये 68,438 अपघात झाले असून त्यामध्ये 13,057 व्यक्ती मृत्युमुखी पडल्यात, तर 24,865 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत.

*    भारतात दरदिवशी 1301 अपघात होतात. प्रत्येक तासाला 54 अपघाताप्रमाणे एक अपघात होतो व प्रत्येक चार मिनिटाला एक अपघाती मृत्यू होतो.

*        भारतात 15 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या  सर्वाधिक मृत्यूचे कारण अपघात हेच आहे.

*    भारतातील अपघातांचा अभ्यास केला असता अपघातामुळे भारताचे सुमारे 55 हजार करोड रुपयांचे दरवर्षी नुकसान होत असल्याचे दिसून येते ते जीडीपीच्या 3 टक्के आहे असे नियोजन आयोगाने 2010 च्या अहवालात म्हटले आहे.

*    देशात 75 टक्के अपघात हे मानवी घटकांच्या चुकीमुळे तर 7 टक्के नैसर्गिक घटक आणि 18 टक्के इतर घटकांमुळे होतात.
 
Top