नळदुर्ग -: येथील नगरपालिकेचे नगराध्‍यक्ष नितीन कासार यांनी दि. 18 डिसेंबर रोजी तडकाफडकी जिल्‍हाधिका-यांकडे अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्‍यामुळे नगरपालिका व परिसरातील राजकीय गोटात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
       दि. 26 डिसेंबर 2011 रोजी नितीन कासार यांची नळदुर्गच्‍या नगराध्‍यक्षपदी निवड झाली होती. येत्‍या दि. 26 डिसेंबरला त्‍यांच्‍या अध्‍यक्षपदाच्‍या कारकिर्दीस एक वर्षे पूर्ण होणार होते. मात्र त्‍यापूर्वीच त्‍यांनी मंगळवार दि. 18 डिसेंबर रोजी आपल्‍या पदाचा राजीनामा जिल्‍हाधिका-याकडे सोपविला आहे. त्‍यांनी एक वर्षाच्‍या कालावधीत न.पा.च्‍या अध्‍यक्षपदावरून काम करीत असताना प्रामाणिक व निःस्‍वार्थपणे शहराचा विकास साधण्‍यासाठी प्रयत्‍न केला. पाणी पुरवठा व शहर स्‍वच्‍छतेच्‍या बाबतीत त्‍यांचे कार्य उल्‍लेखनीय होते. राजकारणात काम करीत असताना कासार यांच्‍यावर कधीही भ्रष्‍टाचाराचे आरोप झाले नाहीत, असे आवर्जुन त्‍यांचे विरोधकही सांगतात. नितीन कासार हे स्‍वच्‍छ चारित्र्याचे नेतृत्‍व म्‍हणून ओळखले जाते. नगराध्‍यक्ष पदावरुन ते सध्‍या रजेवर होते. या कालावधीत प्रभारी नगराध्‍यक्ष म्‍हणून शहबाज काझी हे काम पाहत होते. राजीनाम्‍याबाबत नितीन कासार यांना विचारले असता, त्‍यांनी आपली निवड दहा महिन्‍यांसाठीच केली होती. मुदत संपल्‍यामुळे आपण अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असे सांगितले. परंतू कासार यांनी तडकाफडकी  अध्‍यक्षपदाचा राजीनामा का दिला, पक्षश्रेष्‍ठींनी राजीनामा देण्‍यास भाग पाडले का, याबाबत नळदुर्ग शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
 
Top