नवी दिल्‍ली -: गँगरेपविरुद्ध दिल्‍लीत सुरु असलेल्‍या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी इंडिया गेटजवळ पोलिसांचे वॉच टॉवर जाळले. तसेच काही गाड्यांची तोडफोड केली. त्‍यामुळे पोलिसांनी पुन्‍हा लाठीमार आणि अश्रुधूराचा मारा सुरू केला आहे. दिल्‍ली पोलिसांनी आंदोलकांना शांततेने आंदोलन करण्‍याचे आवाहन केले आहे. परंतु, आंदोलकांनी त्‍यांना प्रतिसाद दिलेला नाही. दरम्‍यान, पोलिसांनी योगगुरु बाबा रामदेव यांच्‍याविरोधात आंदोलकांना भडकाविण्‍याचा गुन्‍हा दाखल केला आहे. सध्‍या पोलिसांनी इंडिया गेटचा परिसरातून आंदोलकांना हुसकावून लावले आहे. अमर जवान ज्‍योतीजवळील परिसरातूनही आंदोलकांना हटविण्‍यात आले आहे. काही ठिकाणी गोंधळ उडाला. चेगराचेगरी झाली. अनेक जण जखमी झाले. या भागातून प्रसार माध्‍यमांचे कँमेरेही हटविण्‍यात आले असून जॅमर लावण्‍यात आले आहेत.
         काल आंदोलन अतिशय शांतते झाले होते. परंतु, आज हिंसक वळण लागले. आंदोलकांनामध्‍ये काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्‍याचा अहवाल पोलिसांनी दिला. त्‍यामुळे राजकीय हेतू या आंदोलातून साध्‍य करण्‍याचा प्रयत्‍न सुरु आहे. त्‍यातूनच हिंसाचाराच्‍या काही घटना घडल्‍या आहेत.
   आज भाजप नेत्‍या सुषमा स्‍वराज यांनी आंदोलकांना शांतता बाळगण्‍याचे आवाहन केले आहे. हिंसक मार्गाने आंदोलन करु नका, असे आवाहन त्‍यांनी केले. तसेच गृहमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलाविण्‍याचेही आवाहन त्‍यांनी केले.
    राजपथावर दुपारी पोलिसांनी आंदोलनकर्त्‍यांवर लाठीमार आणि अश्रूधुराचा वापर केला होता. पाण्‍याच्‍या फवा-याचा वापर करून आंदोलकांना पांगवण्‍यात आले. संपूर्ण आंदोलन आता पोलिसांच्‍या आवाक्‍याबाहेर गेल्‍याचे दिसत आहे. पोलिसांनीही राजकीय कार्यकर्त्‍यांनी आंदोलनात शिरकाव केल्‍याचा दावा करीत त्‍यांच्‍यामुळे वातावरण अधिक गंभीर होण्‍याची भिती व्‍यक्‍त केली आहे. इंडिया गेटच्‍या परिसरात आंदोलकांनी जाळपोळही केली. काही काळ आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलक पोलिसांच्‍या विरोधात घोषणाबाजी करीत आहेत.
      तत्‍पूर्वी, सोनिया गांधींनी दिल्‍ली येथील सामुहिक बलात्‍कारा विरोधात आंदोलन करणा-यांना कायद्यात बदल करण्‍याचे आश्‍वासन दिले आहे. केंद्रीय गृहराज्‍यमंत्री आरपीएन सिंग यांनी सोनिया आणि आंदोलनकर्त्‍यांदरम्‍यान बैठक झाल्‍यानंतर ही माहिती दिली. सोनियांच्‍या आश्‍वसनानंतरही आंदोलनकर्त्‍यांनी निदर्शने सुरुच राहतील, असे सांगितले.
     दिल्‍लीमध्‍ये झालेल्‍या सामुहिक बलात्‍कारातील आरोपींना फाशीची शिक्षेची मागणी करण्‍यासाठी जमा झालेल्‍या युवा आंदोलकांना पोलिसांनी सकाळ होताच विजय चौकातून बळजबरीने हटवण्‍यात आले आणि त्‍यांना बसमध्‍ये बसवून दिल्‍लीच्‍या बाहेर पाठवण्‍यात आले. मीडियातील लोकांनाही विजय चौकातून बळजबरीने हटवण्‍यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्‍हणून दिल्‍लीमध्‍ये जमावबंदी कलम 144 लागू केले आहे. संपूर्ण परिसराचे छावणीत रूपांतर झाले आहे. दिल्‍ली पोलिसांचे पुढील आदेश येईपर्यंत सहा मेट्रो स्‍टेशन्‍स बंद करण्‍यात आले आहे. जंतर मंतरवर निदर्शने करण्‍यास बंदी घालण्‍यात आले आहे.


* सौजन्‍य दिव्‍य मराठी
 
Top