नळदुर्ग : उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील 220 गावात वसुंधरा राज्‍यस्‍तरीय पाणलोट विकास यंत्रणेंतर्गत एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी कार्यालय व काही संस्‍थांच्‍या माध्‍यमातून राबविण्‍यात येत आहे. तो प्रकल्‍प यशस्‍वी होण्‍यासाठी संबंधित गावातील महिलांचा सहभाग आवश्‍यक आहे. याशिवाय हा प्रकल्‍प यशस्‍वी होणार नाही, असे मत परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे सचिव मारूती बनसोडे यांनी मांडले.
       दि. 9 डिसेंबर रोजी शेलगाव (दि.) ता. कळंब या गावात एकात्मिक पाणलोट व्‍यवस्‍थापन केंद्र, यशदा, पुणे व परिवर्तन सामाजिक संस्‍था नळदुर्ग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कळंब यांच्‍यावतीने महिलांसाठी आयोजित केलेल्‍या प्रकल्‍प परिचय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गावचे सरपंच सौ. कौशल्‍या काकडे या होत्‍या. या शिबीरात गावातील बचतगटाच्‍या महिला व शेतकरी महिला मोठ्या संख्‍येने उपस्थित होत्‍या. पाणलोट विकास प्रकल्‍पातून आपल्‍या गावात कोणती कामे होणार आहेत, त्‍यात आपला सहभाग कसा आवश्‍यक आहे, या संदर्भात मार्गदर्शन करण्‍यात आले. शेवटी आण्‍णा सातपुते यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटो -: प्रकल्‍प परिचय प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करताना मारूती बनसोडे.

पाणलोट विकास प्रकल्‍प हा शेतक-यांसाठी वरदान ठरणार :  बनसोडे
नळदुर्ग : आज पाण्‍याचा प्रश्‍न अत्‍यंत गंभीर होत असून पाण्‍याचे व्‍यवस्‍थापन व सनियंत्रण करणे आता काळाची गरज आहे. यातच वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेंतर्गत एकात्मिक पाणलोट व्‍यवस्‍थापन कार्यक्रम जो सुरू केला आहे तो शेतक-यांसाठी वरदान ठरणार असून गावातील सर्व शेतक-यांनी हा प्रकल्‍प समजून घेऊन व आपल्‍या गावात यशस्‍वी करावा, असे आवाहन परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे सचिव मारूती बनसोडे यांनी केले.
    शेलगाव (दि.) ता. कळंब येथे दि. 10 डिसेंबर रोजी गावातील शेतकरी बांधवासाठी आयोजित केलेल्‍या परिचय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास गावातील शेतकरी, कारागीर, बेरोजगार युवक, मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते. आण्‍णा सातपुते यांनी सर्वांचे आभार मानून प्रशिक्षणाचा समारोप केले.
 
Top