बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शीचे सुपुत्र संगणकतज्ञ किरण झरकर यांनी बेसिक कॉम्‍प्‍युटर कोर्स (बी.सी.सी.) साठी आवश्‍यक असलेल्‍या सोप्‍या इंग्रजी भाषेतील पुस्‍तकाची निर्मिती केली आहे. नुकतेच दिल्‍लीमध्‍ये विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथराव मुंडे यांच्‍या हस्‍ते संगणक पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले आहे.
     यापूर्वी झरकर यांच्‍या सी प्रोग्रामिंग वुईथ लॅब मॅन्‍युअल या पदविका अभ्‍यासक्रमासाठी उपयुक्‍त पुस्‍तकाची निर्मिती केली आहे. त्‍यांच्‍या पुस्‍तकाला वाढती मागणी व उपयुक्‍तता यामुळे त्‍यांनी विद्यार्थ्‍यांना संगणक प्रशिक्षण सुलभ होण्‍यासाठी या पुस्‍तकाची निर्मिती केली आहे. यातच औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थांच्‍या विद्यार्थ्‍यांना अंतिम प्रमाणपत्रासाठी डिजीईटी नवी दिल्‍ली बोर्डच्‍या परिपत्रकानुसार बी.सी.सी. कोर्स सक्‍तीचा केला आहे. सेमी ऑनलाईन परीक्षा पध्‍दतीदेखील सुरू करण्‍यात आल्‍याने विद्यार्थ्‍यांना संगणक अभ्‍यासक्रम अवघड वाटत होता. विद्यार्थ्‍यांमध्‍ये आत्‍मविश्‍वास व सोप्‍या पध्‍दतीने शिक्षण देण्‍यासाठीच झरकर यानी पुस्‍तकाचे लिखान केले आहे.
      त्‍यांच्‍या बेसिक कॉम्‍प्‍युटर कोर्स (बी.सी.सी.) या पुस्‍तकात 50 प्रात्‍यक्षिके समाविष्‍ट करून आधुनिक, जुन्‍या संकल्‍पनांसह माहिती तंत्रज्ञान कायदा, प्रश्‍नसंच, संरक्षक बाबींचा सचित्र वर्णनासह समावेश केला आहे.
      यावेळी बोलताना गोपीनाथ मुंडे यांनी म्‍हटले, आय.टी.आय. म्‍हणजे हमखास नोकरी देणारे शिखण व संगणक साक्षरतेच्‍या कार्यक्रमापुढे शिक्षणात क्रांती घडत आहे. देशपातळीवरील अद्ययावत अभ्‍यासक्रमाचे पुस्‍तक लिहून महाराष्‍ट्रात भर टाकली आहे.
      महाराष्‍ट्र शासनाच्‍या व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाच्‍या सहसंचालक डॉ. रविंद्र बाळापुरे यांनी प्रकाशनास परवानगी देताना प्रशिक्षणार्थ्‍यांना संगणक व माहिती तंत्रज्ञान साक्षर व्‍हाव व भारतातील औद्योगिक क्षेत्रात उज्‍वल भवितव्‍य घडवा असा संदेश दिला आहे. भूम परंडाचे आमदार राहुल मोटै यांनी सदरील पुस्‍तके हे संगणक साक्षर होण्‍याकरीता गरजेचे असल्‍याचे म्‍हटले आहे. झरकर यांच्‍या पुस्‍तकास अनेक तज्ञांनी वाचन करून प्रतिक्रिया दिल्‍या आहेत. शिक्षक व विद्यार्थ्‍यांनी सदरच्‍या पुस्‍तकाचे स्‍वागत केले आहे.
 
Top