मुंबई -: अपंग कल्याणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण पुरस्कार देण्याचा नाशिक येथे 3 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
अपंग कल्याणासाठी स्वयंस्फूर्तीने कार्य करणाऱ्या व्यक्तींना, संस्थांना त्यांच्या कल्याणकारी कामाची दखल घेऊन व त्यांनी यापुढेही कार्यरत रहावे यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य, अपंग कल्याण पुरस्कार दरवर्षी 3 डिसेंबर या जागतिक अपंग दिनी प्रदान करण्यात येतो. या वर्षी 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित केलेला कार्यक्रम माजी पंतप्रधान आय. के. गुजराल यांचे निधन झाल्यामुळे शासनाच्या राजशिष्टाचार विभागाने दिलेल्या निर्देशानुसार पुरस्कार प्रदान कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सुधारित कार्यक्रमाची वेळ नंतर जाहीर करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तींनी, संस्थांनी तसेच सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात आले आहे.