अहमदाबाद - अहमदाबादमधील एका ५२ वर्षीय महिलेने व तिच्या ३० वर्षीय मुलीने मुंबईतील मुक्ती शहा या शेअर बाजारातील दलालाची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे १७ तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ही हत्या संपत्तीच्या हव्यासातून झाली असल्याचे अहमदाबाद पोलिसांनी सांगितले.
        मुक्ती शहा हा शेअर बाजारातील दलाल व्यवसायाच्या निमित्ताने नेहमी अहमदाबादला येत असे. तो मूळचा मुंबईचा कांदिवली भागातील रहिवासी आहे. अहमदाबादला पैसे गुंतवणुकीच्या निमित्ताने त्याची अमिता भट (५२) या महिलेशी ओळख झाली. संबंधित महिलेचा पती निवृत्त झाल्याने त्याचे पैसे बाजारात तिला गुंतवायचे होते. याच्यातूनच त्यांची ओळख वाढली व घरगुती संबंध झाले. पुढे अमिताबरोबर त्याचे अनैतिक संबंध निर्माण झाले. अमिताची मुलगी ध्वनी (३०) ही फॅशन डिझायनर असून, तिचेही हळू-हळू मुक्ती शहाशी अनैतिक संबंध निर्माण झाले. शहा याचे अमिता व तिची मुलगी ध्वनी याच्याबरोबर एकाचवेळी संबंध झाल्याने तो त्यांना वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी फिरायवयास घेऊन जात असे. यातच त्याच्या संपत्तीबाबत ध्वनीला माहिती मिळाली. शहाची पनवेलजवळ १७ कोटींची मालमत्ता असल्याचे तिला समजले. ध्वनी आणि शहा हे सहा महिन्यापूर्वी लोणावळा-खंडाळा येथे फिरायला आले होते. त्या दरम्यान ध्वनीने आपल्या वकिलामार्फत साठेखत/रजिस्ट्री करुन घेतले. तसेच शहा दारुच्या नशेत असताना ध्वनीने त्याच्याकडून स्वाक्ष-या घेतल्या. त्यानंतर ध्वनी व अमिता यांनी त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्या गेल्या सहा महिन्यासाठी प्रयत्नशील होत्या. याआधी त्यांनी तसा तीनदा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना अपयश येत होते.
         अखेर १० डिसेंबरच्या आसपास त्यांनी शहाला अहमदाबादला बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्या गाडीत त्यांनी अहमदाबादहून मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याच्या चहात त्यांनी विषारी औषध टाकले. मला कसे तरी होत असून भोवळ येत आहे असे सांगताच ध्वनीने मी गाडी चालविते असे सांगून त्याला व तिच्या आईला मागे बसविले. त्यानंतर रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी तेथेच त्याच्या शरीराचे १७ तुकडे करुन आनंद जिल्ह्यातील वसाड या गावात फेकून दिला. त्यानंतर या दोघींनी त्याची चारचाकी गाडी तेथेच सोडून दिली. या दोघींनी एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागितली व अहमदाबादला परत गेल्या. त्यानंतर स्थानिक पोलिसांना त्याची गाडी व त्याचा मृतदेह आढळून आला. गाडीत दुपट्टा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी शहाचे मोबाईल रेकॉर्ड तपासले असता अमिता व ध्वनीबरोबर तो वारंवार संपर्कात असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी हत्येची कबूली दिली. तसेच ही हत्या संपत्तीच्या हव्यासापोटी केल्याचे सांगितले.
* सौजन्‍य दिव्‍यमराठी

 
Top