मुंबई -: राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणात पाच लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट असून या धोरणाच्या माध्यमातून राज्यात 20 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती  उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज येथे दिली.
      हॉटेल सॉफिटेल येथे आयोजित भारतीय आणि अनिवासी भारतीय उद्योजकांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत  होते. यावेळी गोवा राज्याचे उद्योगमंत्री महादेव नाईक, राज्यसभा सदस्य पियुष गोयल, महाराष्ट्र औद्योगिक आणि आर्थिक विकास असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके, इन्डो कॅनडा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष नवल बजाज, उद्योजक आदी मान्यवर उपस्थित होते.
      विशाल उद्योगाप्रमाणे अति विशाल उद्योगांनाही प्रोत्साहन, एक खिडकी योजनेचे सक्षमीकरण, एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करणे इत्यादी तरतुदी नवीन धोरणात असून जीएसडीपी उत्पादनाचा हिस्सा 16 वरून 28 टक्क्यांवर नेण्याचा प्रयत्न आहे. या नवीन औद्योगिक धोरणामुळे महाराष्ट्रातील उद्योग विकासाचा वेग वाढेल असेही श्री. राणे यांनी यावेळी सांगितले. 
      याप्रसंगी एस. एम. ई. चेंबर ऑफ इंडिया  आणि इन्डो कॅनडा एस. एम. ई. चेंबर, ब्रॅम्पटन एस. एम. ई. चेंबर यांच्यातील सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. 
 
Top