मुंबई : धुळे शहरामध्ये काल दोन गटांमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मंत्रालयात तातडीच्या बैठकीत घेतला. या दंगलीच्या घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार व जखमी झालेल्या व्यक्तींच्या औषधोपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
      या आढावा बैठकीमध्ये राज्याचे मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.राज्याचे अपर पोलीस महासंचालक जावेद अहमद यांनी तातडीने धुळे येथे जाऊन घटनेची माहिती घ्यावी व परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता आवश्यक ते मार्गदर्शन करण्याचे आदेश  चव्हाण यांनी यावेळी दिले.
    धुळे शहराच्या मच्छीबाजार, पालाबाजार आणि माधवपुरा येथे दंगलीच्या घटना घडल्या. या ठिकाणी असलेली घरे, दुकाने व वाहनांची जाळपोळ करण्यात आली.  तसेच मोठ्या प्रमाणावर दगडफेक, ॲसीड व सोडा वॉटर बाटल्या फेकण्यात आल्या.  परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता पोलिसांनी  प्रथम अश्रुधूर, प्लॅस्टीक बुलेटचा वापर केला व शेवटी गोळीबार केला.  या गोळीबारामुळे चार नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.  या हिंसाचाराच्या घटनेत  11 पोलीस अधिकारी, 102 पोलीस कर्मचारी व 100 नागरिकही जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या पोलिसांमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा अपर पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी व इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे.  या घटनेनंतर प्रभावित झालेल्या भागामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
     या घटनेची जिल्हादंडाधिकारी यांनी, अपर जिल्हा दंडाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.  तसेच, ही चौकशी दोन महिन्याच्या आत पूर्ण करण्यात येईल, अशा सूचनाही त्यांना देण्यात आलेल्या आहेत. 
 
Top