सांगली -: जायकवाडी धरणातून बिअर उत्पादक कंपन्यांना द्यायला तुमच्याकडे पाणी आहे; मग शेती आणि पिण्यासाठी का नाही, असा सवाल स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे सरकारला केला.
       शेट्टी म्हणाले, ‘‘येणा-या सहा महिन्यांत पाण्याच्या भीषण टंचाईला राज्यातील दुष्काळी जनतेला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर होण्याची गरज असताना सरकारच पाण्याची उद्योगांसाठी उधळण करत आहे. मराठवाड्यात जायकवाडी धरणाच्या पाण्यासाठी मारामारी सुरू असताना सरकारने मात्र बिअर उत्पादन करणारया कंपन्यांना पाणी दिले आहे. इकडे पिण्यासाठी पाण्याची ओरड सुरू आहे; मात्र शासन त्याकडे दुर्लश्र करत आहे. उद्योगांना पाणी द्यायला हरकतही नाही; पण लोकांना इकडे प्यायला पाणी नसताना उद्योगांचे लाड कशासाठी, असा सवाल त्यांनी केला.
        शासनाच्या या शेतकरीविरोधी धोरणाच्या विरोधात आंदोलनाची सुरवात येत्या 13 तारखेला सांगली जिल्ह्यातील मांजर्डे या गावात दुष्काळ निर्मुलन परिषद घेवून करणार असल्याचे सांगून श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘सिंचन योजना पुर्ण केल्यास दुष्काळाची तीव्रता कमी होणार असल्याची जाणीव यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनाही होती. म्हणूनच त्यांनी सिंचन योजनांचा आराखडा तयार केला. मात्र आजच्या राज्यकर्त्यांना गेल्या 30 वर्षांत या योजना पुर्ण करता आल्या नाहीत. वास्तवीक सांगली आणि सोलापूर जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणारी टेंभू योजना पुर्ण करण्यासाठी 2700 कोटी रुपयांची गरज आहे. ही रक्कम केंद्र शासनासाठी फार मोठी नाही. मात्र राज्य शासनही त्यासाठी हवा तो रेटा लावत नाही. म्हणून आम्ही आता या योजना पुर्ण होवून कायमचा दुष्काळ हटावा, यासाठी दुष्काळ निर्मुलन परिषदेच्या माध्यमातून जनआंदोलनाचा लढा सुरू करत आहोत. यात यश मिळायला वेळ लागेल; मात्र राज्यातील दुष्काळी तालुक्यांसाठी ही लढाई आता अखंडपणे सुरू राहील.’’

 
Top