बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- उपळाई रोड येथील प्रभाग क्रमांक 4 ब च्‍या पोटनिवडणुकीत राष्‍ट्रवादीच्‍या मेनकाताई चव्‍हाण विरूद्ध कॉंगेसच्‍या शालन झांबरे यांच्‍यात लढत झाली यात कॉंग्रेसच्‍या शालन झांबरे यांनी 161 मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.
    अत्‍यंत चुरशीच्‍या झालेल्‍या मतदानात कॉंग्रेसचे राजेंद्र राऊत व राष्‍ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी व त्‍यांच्‍या कार्यकर्त्‍यांनी आपल्‍या उमेदवारांना विजयी करण्‍यासाठी आटोकाट प्रयत्‍न केले. यात राऊत यांना यश मिळाले आहे. यानिमित्‍त घेण्‍यात आलेल्‍या सभेत सोपल यांनी विकास कामांना मुद्दा केले तर राऊत यांनी विकासाच्‍या ऐवजी निकृष्‍ट कामे झाल्‍याचे आरोप केले. अत्‍यंत शिगेला पोहोचलेल्‍या आरोप प्रत्‍यारोपानंतर झालेल्‍या मतदानास 9156 पैकी केवह 5255 मतदारांनी आपला हक्‍क बजावला.
        मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 ब याच जागेसाठी राष्‍ट्रवादीच्‍या चव्‍हाण कौशल्‍या दिलीप याना 2729 मते मिळून 116 मतांनी विजयी झाल्‍या होत्‍या. यावेळी त्‍यांच्‍या विरूद्ध कॉंग्रेसच्‍या मते तारामती उत्‍तम यांना 2613 मते तर श्विसेनेच्‍या पवार संगीता विजय यांना 411 मते मिळून पराभूत व्‍हावे लागले होते. या जागेसह सोपल गटास 24 जागांवर विजय मिळाला आणि राऊत गटास 14 जागा मिळाल्‍या होत्‍या. या एका जागी राष्‍ट्रवादीच्‍या जागेवर कॉंग्रेसने सत्‍ता काबीज केली असून मागील पराभवाचा बदला घेतला आहे. संगीता पवार यांच्‍या माध्‍यमातून शिवसेनेला मिळालेल्‍या 411 मतांची विभागणी टाळण्‍यास राऊत गटाला यश आले असून एकास एक अशा लढतीत राऊत यांना फायदा झाला आहे. मागील तिरंगी लढतीत आणि आताच्‍या दुरंगी लढतीत चित्र पलटी झाल्‍याचे दिसून येत आहे. आमदारकीच्‍या बाबत देखील राऊत, सोपल व बारबोले या तिरंगी लढतीत सोपल यांचा विजय झाला तर राऊत विरूद्ध सोपल यांच्‍यात राऊत यांचा विजय झाल्‍याचे चित्र होते. यावरुन मतांची विभागणी झाल्‍याशिवाय राष्‍ट्रवादीला सर्वकष यश नसल्‍याचे चित्र दिसून येत आहे. तर कोणत्‍याही परिस्थितीत फक्‍त दुरंगी लढत करण्‍याचे कौशल्‍य राऊत यांना दाखवावे लागेल. काही महिन्‍यावर येऊन ठेपलेल्‍या आमदारकीच्‍या निवडणुकीपर्यंत आणखी कोणकोणती राजकीय समिकरणे बदलतील यावर यापुढील राजकारण अवलंबून आहे. सध्‍या तरी राऊत गटात उत्‍साहाचे वातावरण तयार झाले आहे.
 
Top