सोलापूर :- मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघातर्फे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पत्रकार एस.एम. देशमुख यांना आज प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
            या पुरस्कार वितरण प्रसंगी ज्येष्ट पत्रकार प्रकाश जोशी, माहिती संचालक श्रीमती श्रध्दा बेलसरे - खारकर, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण, पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते.
         एस.एम. देशमुख यांनी ग्रामीण भागातील समस्या आपल्या लखनीद्वारे केवळ मांडली नाही, तर ती सोडविण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा केला, असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्य करत असतात, ते करीत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाणे आवश्यक आहे. येणार प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. दुष्काळाच्या निमित्ताने ग्रामीण भागासाठी बिकट वाट आहे. या समस्येला सामोरे जात असताना आपण योग्य निर्णय घेऊ, सगळेजण मिळून या समस्येवर मात करुन, आपल्या सहका-यांसाठी प्रयत्न करुया असेही ते शेवटी म्हणाले.
           ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी यावेळी म्हणाले, सध्या जीवन वेगाने बदलतय, त्याबरोबर पत्रकारितेतील आपली भूमिका, पत्रकारिता हे देखील बदलत आहे. आपण आपल्यात बदल नाही केला तर मागे पडू कुणाशी ममत्व आणि आकस न ठेवता पत्रकारिता केली समस्या निर्माण होणार नाहीत. सत्काराला उत्तर देताना श्री. देशमूख म्हणाले, ग्रामीण भागात काम करणा-या माझ्या सारख्याला मानाचा पुरस्कार देवून केलेला सन्मान, हा चळवळीशी जोडल्या गेलेल्या राज्यातील पत्रकारांचा सन्मान आहे असे मी समजतो.
         कार्यक्रमाच्या सुरुवातीला वार्ताहर संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारामागील भूमिका अनिकेत जोशी यांनी मांडून मानपत्राचे वाचन केले. यावेळी निवड समितीचे सदस्य धमेंद्र जोरे व अनिकेत जोशी यांचाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी वार्ताहर संघाचे कार्यवाह संजीव शिवडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
 
Top