इंदूर/नवी दिल्ली -: अत्याचाराच्या प्रकरणात ‘भारत’ आणि ‘इंडिया’ अशी तफावत करून टीकेचे धनी ठरलेले रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आणखी एका वक्तव्यावरून नवा वाद उभा ठाकला आहे. लग्न म्हणजे आता नाते नव्हे, तर सौदेबाजी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तथापि, संघाने मात्र भागवत यांच्या वक्तव्याचा योग्य अर्थ काढला जात नसल्याचे म्हटले आहे.
        शनिवारी एका कार्यक्रमात भागवत म्हणाले की, आधी जग नात्यांवर आधारलेले होते. आता स्वार्थावर आधारित झाले आहे. थेअरी ऑफ सोशल कॉन्ट्रॅक्ट. पत्नीशी पतीचा हा सौदा ठरला आहे. आपण त्याला विवाह संस्कार म्हणत असाल. परंतु हा एक सौदा आहे. तू माझे घर सांभाळ, मला सुख दे, मी तुझ्या पोटापाण्याची सोय करीन. तुला सुरक्षित ठेवीन. जोवर पत्नी राहते तोवर पती कॉन्ट्रॅक्टपूर्तीसाठी झटतो. कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करता येत नसेल तर तिला सोडून द्या. याउलट पती कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करू शकत नसेल तर त्याला सोडून द्या. दुसरा.. दुसरा.. कॉन्ट्रॅक्ट शोधा. हे असेच चालले आहे. सगळय़ा गोष्टीत सौदा आहे.
वृंदा करात यांच्याकडून निषेध : माकप नेत्या वृंदा करात यांनी भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध केला. हे ऐकून मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. वास्तविक रा.स्व. संघाचा हाच खरा चेहरा आहे. भाजपच्या सत्ताकाळात हाच विचार समोर येत होता. मनुस्मृ़तीवर आधारित घटना त्यांना करायची आहे, असे करात यांनी म्हटले आहे.
विपर्यास केला - राम माधव : भागवत यांनी पाश्चात्त्य विवाह संस्थेबाबत टिप्पणी केली होती. माध्यमांनी भारतीय विवाहसंस्थेसंबंधीचे त्यांचे विचार म्हणून ती दाखवली. हे पूर्णपणे खोटे आहे, अशा शब्दांत संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी बाजू मांडली आहे.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी
 
Top