मुंबई :- कौशल्य विकास कार्यक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी व अधिकाधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग ब्रिटिश शासनासोबत सामंजस्य करार करुन कौशल्य विकास कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री डी.पी.सावंत यांनी आज येथे दिली.
      ग्रेट ब्रिटनचे शिक्षण तथा कौशल्य विकास मंत्री जॉन मॅथ्यू हॅनकॉक यांनी शिष्टमंडळासमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे  सावंत यांची भेट घेऊन महाराष्ट्रात सुरु असलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमाबाबत चर्चा केली. यावेळी उच्च शिक्षण तथा शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव जे.एस.सहारिया, रोजगार स्वयंरोजगार विभागाचे संचालक विजयकुमार गौतम आदी उपस्थित होते.
        सावंत म्हणाले, मा. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आखून दिलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारत महासत्ता बनावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कौशल्य विकासासाठी ब्रिटिश शासनासोबत संयुक्तरित्या काम केल्याने निश्चितच अधिक व प्रभावी कुशल कामगार निर्माण होतील असेही ते म्हणाले.
    राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत सुरु असलेल्या विविध कौशल्यावर आधारित कार्यक्रमांची माहिती श्री. सहारिया यांनी उपस्थितांना दिली. तर महाराष्ट्रातील कौशल्य विकास कार्यक्रमाबाबत गौतम यांनी सविस्तर सादरीकरण केले.
     या दरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यात प्रामुख्याने सुरुवातीला बांधकाम क्षेत्राच्या कुशल कारांगिरांबाबत चर्चा करण्यात आली तर इतर क्षेत्रातील कुशल कारागिरांच्या बाबतही लवकरच निर्णय घेण्याचा तसेच बांधकाम क्षेत्रातील कारागिरांबाबत निश्चित कार्यक्रम व धोरण करण्याचे ठरले.
     या शिष्टमंडळात अमंदा ब्युचर, सुसान पेंबर, मार्टीन डोएल, आशा खेमका, मार्टीन प्राईज, पिटर बेकींगहॅम, अँड्रयू जॅक्सन, सॅम हार्वे, मंजुला राव आदींचा समावेश होता.
 
Top