सोलापूर :- सोलापूर जिल्हयात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्न राबविण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
         शासकीय विश्रामगृहात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेतखाली सोलापूर जिल्हा टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस महापौर अलका राठोड, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, सर्वश्री आमदार बबन शिंदे, दिलीप सोपल, दिलीप माने, दिपक साळुंखे, उपमहापौर हारुण सय्यद, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जिल्हा पोलिस अधिक्षक राजेश प्रधान, महापालिका आयुक्त अजय सावरीकर उपस्थित होते.
        बैठकीत अधिका-यांना सुचना देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, उपलब्ध असणा-या पाण्याचा विचार करता कठोर निर्णय घेऊन पिण्याच्या पाण्याचे ३० जुन पर्यंत नियोजन करावे. शिरपूर पॅटर्न अंतर्गत जिल्हयातील विविध तलावातील गाळ काढून महात्मा फुले जल व भुमि संधारण अभियानांतर्गत तो गाळ शेतक-यांना उपलब्ध करुन द्यावा. नाला खोदाई आणि जलसंधारण कामे अधिक प्रमाणात घेऊन दुष्काळी कामासाठी जिल्हयातील साखर कारखान्यांकडून  पिण्याच्या पाण्याच्या टाक्या किंवा यांत्रिक गोष्‍टी उपलब्ध करुन घेण्याच्या सुचना त्यांनी बैठकीत केल्या. 
        भिमा-सिना नदीवरील  कोल्हापूरी बंधा-यावरील पाणीपुरवठा योजनांसाठी ८७ ठिकाणांवरती स्वतंत्र फीडर बसविण्यासाठी ३.२५ कोटी रुपयांचा निधीला मान्यता देण्यात आली असून ती कामे तातडीने सुरु करावीत. ज्या गावांनी पाणीपुरवठा योजनेची वीज बिलाची ३३ टक्के रक्कम भरली आहे. त्या गावाचे वीज कनेक्शन ३० जुन पर्यंत कोणत्याही परिस्थितीत तोडू नये अशा सूचना त्यांनी वीज महामंडळाला दिल्या.
      भिमा-सिना  नदीवरील बंधा-यांमधून होणारे लिकेज थांबविण्यासाठी कडक भूमिका घेऊन पिण्यासाठी सोडण्यात येणारे पाणी शेतीसाठी वापरले जाऊ नये याकरीता पाणी सोडल्यानंतर संपूर्ण पाणी वाहणा-या मार्गावरती कर्मचारी तैनात करण्याच्या सुचना त्यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या.
        चारा डेपोस मान्यता देताना लोकसंख्येपेक्षा जनावरांची संख्या लक्षात घेऊन आणि आर्थिकदृष्टया सक्षम असणा-या संस्थांनाच चारा डेपोची मान्यता देण्यात यावी. राष्ट्रीय फळबाग योजनेअंतर्गत शेततळी मंजूर करताना ज्या तालुक्यांना दुष्काळी कामांसाठी इतर कोणत्याही शासकीय योजनेचा कमी फायदा झाला आहे. अशा तालुक्यांना प्राधान्यक्रम देण्याचे त्यांनी सुचित केले.
      बैठकीस समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, शिक्षण सभापती शिवानंद पाटील, कृषी सभापती जालींदर लांडे, महिला व बालकल्याण सभापती जयमाला गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
Top