पंढरपूर :- राज्यात दुष्काळ सदृश्य परस्थिती जाणवत असून या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी गावांची पाहणी, केंद्रिय पथकाचे सदस्य व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे (भारत सरकार) उप सल्लगार व्ही.के बाठला यांनी केली.
           सांगोला तालुक्यातील महूद, शिवणे येथील मध्यम प्रकल्प तलाव, अनकढाळ येथील चारा छावणी, पाचेगांव खुर्द येथील शेतक-यांच्या जळालेल्या फळबागा, इंग्रज राजवटीत बांधण्यात आलेला बुध्दीहाळ येथील पाणी साठवण तलाव, सिमेंट बंधारा, टँकर मध्ये पाणी भरण्याचे पाँईन्ट आदीं ठिकाणाची त्यांनी पाहणी केली.तसेच दुष्काळी  स्थितीबद्दल ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली.
       यावेळी जिल्ह्यातील सरासरी कृषी क्षेत्रा पैकी 58 टक्के खरीप तर 61 टक्के इतकी रब्बी पेरणी झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम यांनी सांगितले तर सांगोला तालुक्यात 93 छावण्या सुरु असून त्यामध्ये सुमारे 1 लाख 7 हजार जनावरे तसेच 80 टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरु असल्याची माहिती तहसिलदार नागेश पाटील यांनी दिली.
           सांगोला तालुक्यातील वरील गावांना भेटी दिल्यानंतर श्री बाठला यांनी  मंगळवेढा तालुक्यातील गावांनाही भेटी देऊन तेथील दुष्काळी परस्थिती जाणून घेतली. या प्रसंगी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, कृषी विभागाचे सहसचिव डॉ.एस.एल.जाधव, मृदू संधारण व पाणलोट  विभागाचे संचालक सुरेश आंबुलगेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव, लाभ विकास प्राधिकरणाचे अजय दाभाडे, प्रांतधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा कृषी अधिक्षक अशोक किरनाळे, उजनीचे सचिन पवार, नगराध्यक्ष मारुती बनकर, प.सं सभापती ताई मिसाळ, जि.प.सदस्य अशोक शिंदे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top