नवी दिल्‍ली -: केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव तरतूद केली आहे. महिलांसाठी स्वतंत्र राष्‍ट्रीयकृत बँक आणि महिलांच्या सुरक्षेसाठी 'निर्भया फंड'ची घोषणा चिदंबरम यांनी केली. याशिवाय महिला आणि बालकल्‍याणासाठी वाढीव निधी दिला आहे. याशिवाय असंघटीत क्षेत्रातील महिलांचीही दखल घेत त्‍यांच्‍यासाठीही विमा योजनेची तरतूद अर्थमंत्र्यांनी केली आहे.
         अर्थसंकल्पात महिलांसाठी एकूण 97 हजार कोटींची तरतूद करण्‍यात आली आहे. महिला आणि बालकल्याण मंत्रालयासाठी 41 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आल्याने महिलांच्या सुरक्षेसाठी दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच निर्भया फंड सुरु करण्यात येणार असून, त्यासाठी एक हजार कोटींची तरतूद केली आहे. बचतगट आणि मोलकरणींसाठी समूहगट विमा योजना सुरू करण्यात येणार आहे.
         चिदंबरम यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र बँका स्थापन करण्याची महत्त्वाची घोषणा केली. या बँकेत कर्मचा-यांपासून ग्राहकांपर्यंत सर्व महिलाच राहतील. बँकेसाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात येत असल्याचे सांगितले. या बँकेचा परवाना ऑक्टोबर 2013 पर्यंत मंजूर करण्‍यात येईल, असेही अर्थमंत्री म्‍हणाले.
 
Top