उस्मानाबाद :-  उच्च पदावर काम करतानाही बालपणी मनावर झालेले वाचनाचे संस्कार, साहित्यिकाच्या एखाद्या काव्यकृतीने मनावर केलेलं गारुड आणि प्रशासनात अधिकारी पदावर काम करताना आलेल्या अडचणीवर मात करण्याचं साहित्याने दिलेलं बळ… असे एक ना अनेक अनुभवाचे पदर जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकींनी उलगडले, निमित्त होतं, ग्रंथोत्सव-2013 उपक्रमात आयोजित केलेल्या ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ या उच्च पदावर काम करीत असलेल्या महिला अधिका-यांशी साहित्यिक गप्पांचे!
    महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत उस्मानाबाद येथे ग्रंथोत्सव-2013 उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात या साहित्यिक गप्पा रंगल्या. उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅा. वैशाली कडूकर, गटविकास अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य कमलादेवी आवटे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी या साहित्यिक गप्पात भाग घेतला. राजेंद्र अत्रे, ॲड. देवीदास वडगावकर आणि रवींद्र केसकर या त्रयीने या सावित्रीच्या लेकींच्या बोलते करुन त्यांच्या आठवणींचा कप्पा रसिकांसमोर उलगडला.
    साहित्य म्हणजे काय तर मनाला भिडते ते साहित्य. प्रेरणा देते ते साहित्य अशी मांडणी करीत या साहित्यिक गप्पांना सुरुवात झाली.  शिल्पा करमरकर यांनी अगदी बालपणापासूनच्या आठवणींना उजाळा दिला. जणू या साहित्यिक गप्पांमधून त्यांनी आपले बालपण पुन्हा अनुभवले. परीक्षा असली तरी गोष्टींच्या पुस्तकांशी मैत्री, महाविद्यालयातही पुस्तक वाचनाच्या वेडामुळे मिळालेले गोल्ड कार्ड आणि त्यामुळे ग्रंथालयातील सगळ्या कादंबऱ्यांचा वाचून पाडलेला फडशा, प्रशासनात काम करताना साहित्यानं दिलेला मानसिक आधार, कुटुंबाकडून वाचनासाठी मिळालेले पाठबळ अशा एकेक आठवणीच त्यांनी रसिकांसमोर ठेवल्या.
    डॉ. वैशाली कडूकर  यांनी आपल्या व्यक्तिमत्व विकास आणि वाटचालीत ‘छावा’ ही शिवाजी सावंत यांची कादंबरी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, जीवनमुल्ये प्रेरणादायी असल्याचे सांगितले. बालपण खेड्यात गेले, वडिलांना वाचनाची प्रचंड आवड मात्र आपण ही आवड पाहिजे त्या प्रमाणात जोपासू शकलो नाही, याची खंत त्यांनी आपल्या मनोगतात मांडली. अर्थात, गूढकथा, कादंबऱ्या आवडायच्या, त्यामुळेच पोलीसी सेवेकडे ओढा वाढला असावा, असे त्यांनी सांगितले.
    प्रियदर्शिनी मोरे यांनीही समाजकारणाचा वारसा घरातून मिळाल्याने साहित्यिक आवड जोपासता आल्याचे सांगितले. पहिली कविता सहावीत असताना लिहीली, आता मात्र कविता लिहिणे होत नसल्याची खंत त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली. प्रशासनात सतत लोकांना सामोरं जावं लागतं, अशावेळी साहित्य बळ देतं. मानसिक विकासासाठी वाचनाची आवड गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले. लहानपणी आपण ‘यमक्या कविता’ लिहिल्या तसेच कविता वाचनात भाग घेतला. मैत्रीणीला गोष्ट लिहून दिली आणि तिलाही स्पर्धेत भाग घ्यायला लावला. विशेष म्हणजे, कवितेत मला उत्तेजनार्थ तर मैत्रीणीला गोष्टीत प्रथम क्रमांक मिळाला. ही आठवण ऐकताना अख्खे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.
    कमलादेवी आवटे यांनी आपल्या वाचनाचं वेड हे आई-वडील आणि भावांच्या प्रभावामुळे निर्माण झाल्याचे सांगितले.दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला गेलो की भावंडांची पुस्तक वाचनाची अक्षरश: स्पर्धा असायची. राखीपौर्णिमा, भाऊबीज, वाढदिवसाला भावांकडून हमखास पुस्तकांची भेट मिळायची, हे सांगताना त्या बालपणीच्या आठवणीत हरवून गेल्या. जसजसं मोठे होत गेलो, तसे सानेगुरुजी, गो.नी. दांडेकर यांच्या साहित्याने मनावर प्रभाव निर्माण केला. आजही तो प्रभाव कायम असल्याचे त्यांनी सांगितले. त्या काळात वाचलेल्या लिखाणानेच आपल्याला प्रेरणा दिल्याचे त्या आवर्जून सांगतात.
    पोलीसी सेवेत असणाऱ्या अश्विनी भोसले यांनी आपल्या आठवणींच्या भावनांना या गप्पांमध्ये शब्दरुप दिले आणि यानिमित्ताने त्यांची कवयित्री म्हणून ओळख रसिकांसमोर आली. ‘थोडासा रुमानी हो जाए’ असे म्हणत त्यांनी आठवणींचा एकेक कप्पा उलगडला. मुंबई विद्यापीठात असताना वसंत बापट, शंकर वैद्य, मधू दंडवते, केशव मेश्राम, विजया राजाध्यक्ष, अरुण कांबळे असे दिग्गज साहित्यिक शिक्षक म्हणून लाभल्याचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला. घरात असणारा पुस्तकांचा खजिना वाचनालयासाठी दिला, यातून त्यांच्या सामाजिक जाणीवेची नवी ओळख श्रोत्यांना झाली. गानसम्राज्ञी लतादीदींचा सहवास, प्रत्येक वाढदिवशी त्यांच्या येणाञया शुभेच्छा हा आपल्यासाठी सन्मान असल्याचे सांगताना त्यांचा आवाजही कातर झाला. ज्या लेखकांची पुस्तके अभ्यासक्रमासाठी आहेत, ते लेखक तुम्हाला शिकवतात, ही कल्पनाच खूप मोठी आहे. त्यावेळी आपली अवस्था ‘घेशील किती दो कराने’ अशी होऊन जाते. पी.एच.डी.साठी वि. स. खांडेकर, कवीवर्य कुसुमाग्रज, विंदा करंदीकर या ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांवर पेपर वाचणे हा अनुभव अमूल्य होता. बहिणाबाईंच्या कविता, अब्राहम लिंकनचे पत्र, वीणा गवाणकर यांचे एक होता कार्व्हर या पुस्तकांचा जीवनावर प्रभाव असल्याचे त्या सांगतात.
    आठवणींचा एकेक कप्पा उलगडताना या सावित्रीच्या लेकी श्रोत्यांनाही त्या आठवणीत घेऊन जात होत्या. साहित्यिक गप्पांची ही संध्याकाळ कधी संपूच नये, ही भावना मनी ठेवूनच टाळ्यांच्या कडकडाटात या प्रत्येकीच्या वाटचालीला शुभेच्छा देत रसिकांनी ही मैफील अधिक बहारदार केली.
 
Top