शिवशाही ते लोकशाही

राजे शिवशाहीत होती का मंदी?
झाडे तोडण्‍यावर होती बंदी
एखाद्या किल्‍ल्‍यावर आदर्श सोसायटीची
तानाजीलाही होती का संधी?

डुप्‍लीकेट (चिलखती) जॅकेट
घेतल्‍या असत्‍या का पंतानी
साळसकर, कामटे ठरले असते का
संताजी, धनाजी अन् येसाजी

राजे दुष्‍काळात तुम्‍हीही
मतासाठी घेतल्‍या होत्‍या का सभा
स्विस बँकेत पैसे ठेवायला
संवगडयांना दिली असती का मुभा

राजे अफजल खानाला मारायला
पाठवायची ना कंमाडोंची फौज
वाटल होत का तुम्‍हालाही
एसीत बसून करावी मौज

राजे दुष्‍काळात तुम्‍ही उगाच
शेतक-यांना केला होता सारा माफ
आमचे राज्‍यकर्ते चुकुन तरी
करतील का असले पाप

राजे दुष्‍काळ निवारणासाठी
तुम्‍हीही बांधली होती धरणं
चालल होत का तेव्‍हा
आष्‍ट प्रधानांच जिजोरी भरण

राजे सिंचनासाठी तुमच्‍यावरही
झाली होती का टिका
श्‍वेतपत्रिका काढण्‍यासारखा
प्रसंग आला होता का बाका?

रायबाच्‍या लग्‍नात राजे
तानाजीने दाखविला असता डामडौल
पाण्‍यासारखा पैसा खर्चाला
दिला असता का तुम्‍ही कौल?

विश्रामगृहात चमच्‍यानी केली असती
कल्‍याणच्‍या सुभेदाराची सुन देऊ
खर सांगा राजे तुम्‍हाला
दिसल्‍या असत्‍या का मॉं जिजाऊ?

राजे माफ कराव मांडला असा प्रमाद
शिवशाहीकडून लोकशाहीला घालायची होती साद
राजे पुन्‍हा एकदा क्षमस्‍व
                                                                        - भगवंत सुरवसे
 
 
Top