मुंबई -:  नागरीक आता घरी अथवा कार्यालयात बसून आपल्या फ्लॅटची नोंदणी फी व मुद्रांक शुल्क ई-पेमेंट द्वारे शासनास जमा करु शकतील. नोंदणी फी, मुद्रांक शुल्क तसेच नोंदणी व मुद्रांक विभागास जमा होणा-या इतर सर्व रकमा ई-चलनमार्फत ‘ग्रास’ (गर्व्हमेंट रिसिप्ट अकाऊंट सिस्टिम) या प्रणालीद्वारे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक एस.चोकलिंगम यांनी आज येथे दिली.
       नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज होमी तल्यारखान हॉल रेड क्रॉस येथे नोंदणी फी व मुद्रांक शुल्क शासनाकडे कशा प्रकारे जमा करावयाचा या संदर्भात विकासक आणि त्यांच्या संघटना तसेच वकील आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. लेखा व कोशागारे विभागाचे संचालक शिलानाथ जाधव यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. ए. टी. कुंभार, स्टेट बँकेचे उप महाव्यवस्थापक रविनंदन सहाय आणि विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          मुद्रांक नोंदणी आणि शुल्क विभागात विविध कागदपत्रांची नोंदणी आणि राज्यभरातील जवळजवळ 470 उपनिबंधकांच्या कार्यालयांमार्फत मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा महसूल जमा होत असतो. तसेच लाखों कागदपत्रांची दरवर्षाला या कार्यालयात नोंदणी केली जाते असे सांगून चोकलिंगम म्हणाले, ग्रास या प्रणालीमुळे एका शासकीय कामासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे शुल्क एकाच वेळी एकाच ठिकाणी भरणे शक्य होणार आहे. तसेच नागरिकांना रांगेत उभे न रहाता सोयीस्कर वेळेनुसार शासनाला रक्कम जमा करणे शक्य होत आहे. पारदर्शक कार्यपध्दतीमुळे बनावट चलनाला वाव रहाणार नाही. शासन आणि विकासकांना ही प्रणाली लाभदायक ठरेल.
    जाधव यांनी लेखा व कोषागारे विभागाच्या कामकाजाच्या कार्यपध्दतीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ग्रास ही प्रणाली जून 2010 ला सुरु झाली. अजूनही ती प्राथमिक स्वरुपात असून यावर्षी या प्रणालीमार्फत 10 हजार कोटीचा महसूल जमा झाला आहे. तांत्रिक कौशल्यापेक्षा शासन, कर्मचारी व नागरिकांची विचारधारा बदलणे आवश्यक असून यासाठी नागरिक आणि कर्मचारी यांनी सुलभ असलेल्या या कार्यपध्दतीचा वापर केला पाहिजे. ग्रास या प्रणालीमध्ये अनेक सेवांचा समावेश आहे. जवळ जवळ 13 बँका ऑनलाईन पेमेंटसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. आणखी अनेक बँकांना आवाहन करण्यात आले आहे.  
          भारतीय स्टेट बँक ही सर्वात जुनी बँक आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तीचा विस्तार आहे. ग्रामीण नागरिकांशी तीचा जास्तीत जास्त संबंध आहे. ग्राहकांना अधिकाधिक सेवा सुलभ पध्दतीने देण्याचा आमच्या बँकेचा सातत्याने प्रयत्न चालू असतो. असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे रविनंदन सहाय यांनी सांगितले. मुद्रांक कार्यालयाने अधिकाधिक महसूल वाढविण्यासाठी तसेच कामकाजात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने वेळोवेळी या कार्यपध्दती केलेल्या सुधारणा बाबतची माहिती  डॉ. ए. टी. कुंभार यांनी यावेळी दिली.
 
Top