मुंबई -: ‘शालार्थ’ या नवीन प्रणालीच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन पथदर्शी प्रकल्पांतर्गत निवडलेल्या जिल्हयांत या नवीन प्रणालीमार्फत वेतन अदा करण्याकरिता दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येत आहे.
     राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक  तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिका आणि नगरपालिका शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ‘शालार्थ’ ही नवीन प्रणाली लागू करुन या नवीन प्रणालीद्वारे अदा करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, लातूर या जिल्हयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे जानेवारी 2013 चे वेतन (पेड इन फेब्रुवारी 2013) या प्रणाली द्वारे अदा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. 24 जानेवारी 2013 च्या शासन परिपत्रकान्वये एक महिना मुदत वाढ देण्यात आली होती.
     ‘शालार्थ’ या  नवीन प्रणालीच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सदर प्रणाली 15 दिवस बंद राहणार असल्याने मुंबई, ठाणे, पुणे व लातूर या पथदर्शी जिल्हयांव्यतिरिक्त इतर जिल्हयांनी या नवीन प्रणालीमध्ये डेटा एन्ट्री पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत करु नयेत, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने 15 फेब्रुवारी 2013 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकान्वये दिले आहेत. उपरोक्त शासन परिपत्रकाचा संकेतांक क्रमांक 201302151153000321 असा आहे.
 
Top