बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील समाजसेवक तसेच प्रसिध्द उद्योजक राजेंद्र मिरगणे यांनी सद्य स्थितीत निर्माण झालेल्या दुष्काळात स्वयंप्रेरणेने सामान्य जनतेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. बार्शी, भूम व परंड्यातील वाड्या वस्त्यावर नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी 30 टँकरची तसेच ज्या ठिकाणी साठवण क्षमता नसेलेले त्याकरिता 300 हौद व प्लास्टीकच्या टाक्यांची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. वैयक्‍तीक पातळीवरील मोफत यंत्रणेचा हा पहिलाच उपक्रम आहे.
     राजेंद्र मिरगणे मित्र मंडळाच्या वतीने वाड्या वस्त्यांवर पाणी पोहोचवण्याच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ सोमवारी बार्शी तालुक्यातील कोरफळे येथून करण्यात आला आहे. राजेंद्र मिरगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात कौरवाप्पा मानसे, अशोक सावळे, सुहास मोहिते, मधुकर बरडे, गौतम जगताप, बाळासाहेब पाटील, बिभीषण पाटील, नवनाथ मिरगणे, विनायक घोडके आदि उपस्थित होते.
     गावातील असलेल्या काळ्या पाषाणाच्या स्वच्छ विहीरीत टँकरने आणलेले पाणी सोडण्यात आले व यातून नागरिकांनीघेण्यास सुरुवात केली. लोकांना अत्यावश्यक पाण्याची उपलब्धता अथवा जवळपास पाण्याचा साठा नसल्याने बार्शीतून टँकरद्वारे गावात पाणी नेण्याची सुविधा सुरु झाली आहे. ज्या भागात पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही अथवा अत्यंत गरजेचा प्रश्न असूनही कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही. त्यांनी विनासंकोच दत्‍ता जाधव यांच्याशी 7798355343 अथवा कार्यालयात 02184222226 या या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राजेंद्र मिरगणे यांनी केले आहे.
     यावेळी बोलतांना राजेंद्र मिरगणे म्‍हणाले, याकरिता ज्या ठिकाणी आमच्या वैयक्‍तीक पातळीवर पाणी उपलब्ध होते त्या ठिकाणहून पाणी उचलून पुरवठा करतो, परंतु ज्या ठिकाणी कोणाची मदत नसेल त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपलब्ध पाणी साठा अधिगृहण करुन तो सामान्य जनतेच्या उपयोगात आणला जातो. याकरिता तहसिलदार यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. हा उपक्रम सर्वसामान्यांना त्यांच्या गरजेसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता केला आहे. सदरच्या कार्यक्रमाला अप्रत्यक्ष अडथळा आणण्याचा प्रयत्न काही राजकीय व्यक्तींकडून होत असल्याने त्यांनीही राजकारण बाजूला ठेऊन अथवा आमच्यापेक्षा जास्त समाजसेवा करुन आपली जनतेप्रती असलेली तळमळ व्यक्त करावी. सदरच्या कामाकरिता कोणत्याही लायसनची गरज नाही, लोकांच्या मागणीनुसार आम्ही त्‍यांना आमच्या कुवतीनुसार अथवा ऐपतीनुसार मदत करण्यास तयार आहोत. दुष्काळ परिस्थितीचे भान ठेवावे. मी कोणालाही आपला विरोधक समजत नाही. छाण्यावाचून ग्रामीण भागातील गावेच्या गावे ओस पडत आहेत. अतिशय विदारक परिस्थिती असतांना लोकांच्या भल्याकरिता आम्ही कोणाचीही तमा बाळगणार नाही.
      राजेंद्र मिरगणे म्हणाले, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी केलेल्या सकारामक सहकार्यामुळे बार्शी तालुक्यात प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ लवकर झाला. उमानाबाद जिल्ह्यातील अधिकार्‍यांशी चर्चा करत असून त्या ठिकाणीही तातडीने सुविधा सुरु होईल. हा सामाजिक उपक्रम असून यात राजकारण आणू नये. गरज असेल त्‍यांनी निसंकोच मदत करावे. गावी संपूर्णपणे मोफत सहकार्य करण्यास तयार आहोत.


 
Top