बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : मनुष्य हा कलयुगाच्या रात्री काम, क्रोध, लोभ, मोह अन् अहंकाराच्या अंध:कारात मनुष्य हरवला आहे. ज्ञानसूर्यशिव परमात्‍मा दिव्य जम झालेला आहे व त्यानेच आपल्या सर्वांच्या जीवनात ज्ञानप्रकाश पसरवला असल्याने आपण महाशिवरात्री साजरी करतो, असे मत ब्रह्मकुमारी संगीताबहनजी यांनी व्यक्त केले.
     महाशिवरात्रीनिमित्‍त आयोजित शिवध्वजारोहण समारंभात त्या बोलत होत्या. ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ब्रह्मकुमार वैजीनाथभाई, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाशजी बाफणा, मार्केट कमिटीचे उपसभापती कुंडलिक गायकवाड, रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय खांडवीकर, डॉ. हेमंत साने, लायन्स क्लबचे अध्यक्ष माणिक धारुरकर, नवमहाराष्ट्र विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष महादेव बुचडे, जयप्रकाश माढेकर, सहयोगी मंडळाचे संतोष ठोंबरे, उपअभियंता पोपट राऊत, कृषी अधिकारी चंद्रकांत जाधव, बी.डी. कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
     पुढे बोलतांना संगीताबहनजी म्हणाल्या, ज्याप्रमाणे रोगी रोगमुक्त होतो त्यावेळी त्याचा दिव्य जन्‍म होतो. त्याचप्रमाणे महाशिवरात्री दिवशी आपण आपल्या मनबुध्दीचा संबंध शिव परमात्म्याशी जोडून विकारांच्या रोगापासून मुक्त होतो आणि आपला नव्याने जम होतो. महाशिवरात्री हा ज्याप्रमाणे शिवाचा त्याचप्रमाणे आपलाही वाढदिवस आहे.
     जीवनात खुशी अथवा आनंद नष्ट होण्याचे कारणच व्यर्थसंकल्प असल्याने ती परमात्‍मा त्याला अपर्ण केल्यास आपल्या नकारात्‍मक भावना नष्ट होतील. शिव परमात्‍मा आपल्यावर खुश झाल्याने आपले जीवन आनंदी होईल. जीवनातील समस्या युक्त परिस्थितीमध्ये आपण नकारात्‍मक गोष्टींचा त्याग केल्यास जीवनात कायमस्वरुपी सुख प्राप्त होईल.
     याप्रसंगी वैजिनाथभाई, ओमप्रकाश बाफणा, कुंडलिक गायकवाड यांनी आपले विचार मांडले.  मोहनभाई यांनी आभार तर वैजीनाथभाई यांनी सूत्रसंचलन केले.

 
Top