नळदुर्ग -: भरधाव ट्रक व जीपची समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्‍या भीषण अपघातात एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्‍याची घटना सोमवार रोजी सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील केरुर (ता. तुळजापूर) शिवारात घडली. अपघातातील जखमी व मयत आंध्रप्रदेशातून शिर्डी येथे साईबाबाच्‍या दर्शनासाठी जात होते. मात्र त्‍यांच्‍यावर काळाने घाला घातला.
       डॉ. चैतन्‍य पालेटी (रा. हैद्राबाद) असे अपघातात मरण पावलेल्‍याचे नाव आहे. तर चालक रविकुमार जनार्धन चेकीलाम (वय 36) असे जखमीचे नाव आहे. हैद्राबाद येथील व्यंकय्या व्यंकटेश्‍वर चल्ला हे जावई डॉ. चैतन्य श्रीनिवास पालेटी हे सोलापूरमार्गे शिर्डीला साईबाबाच्या दर्शनाला निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावरील ईटकळजवळील शिरगापूर (ता. तुळजापूर) शिवारात सोलापूरहून हैद्राबादकडे जाणारा ट्रक (क्र.एपी २0 डब्ल्यु २३५६) हा जीप (क्र. एपीए सीएम. ३९५) वर जोराने आदळल्याने जीपमधील चालकाच्या बाजूला बसलेले डॉ. चैतन्य पालेटी हे जागीच ठार झाले तर चालक रविकुमार जनार्दन चेकीलाम हे गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक चालक व क्लिनर अपघातानंतर फरार झाले आहेत. व्यंकय्या चल्ला यांनी दिलेल्‍या फिर्यादीवरुन नळदुर्ग पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला असून पुढील तपास सपोनि सुरेश शेटकर हे करीत आहेत.
 
Top