सोलापूर :- हवामानातील बदलामूळे दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत आहे. सद्य:स्थितीत पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.  दुष्काळ निर्मुलनाला शासन प्राधान्य देत आहे. अधिका-यांनीही दुष्काळ निर्मुलनाचे नियोजनचे काम गांर्भीयाने पार पाडावे असे आवाहन राज्याचे रोजगार हमी योजना, जलसंधारण मंत्री  डॉ. नितीन राऊत यांनी केले.
         मंगळवेढा तालुक्यातील सलगर ब्रुद्रुक येथील सिमेंट बंधा-याची पहाणी केल्यानंतर उपस्थित जनसमुदायासमोर ते बोलत होते. यावेळी आ. भारत भालके,  शिवाजी काळुंके, बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते.
         शासनाकडे निधीची कमतरता नसून मागेल त्याला काम देण्याला शासन कटिबध्द आहे. सलगर (बु.) येथे झालेली जलसंधारणाची कामे इतर गावांतही मोठ्या प्रमाणावर राबविण्यात यावीत मात्र ही कामे करीत असताना शासनाचे निकष पूर्ण करण्याकडे अधिका-यांनी लक्ष द्यावे तसेच जुन्या बंधा-यांना अधिक मजबुत करावे अशी सूचना करुन डॉ. राऊत पुढे म्हणाले की, दुष्काळाचे उच्चाटन करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे घ्यावी लागतील.
       मंगळवेढा तालुक्यातील रेड्डे, भोसे, नंदेश्वर या गावांतील जनतेबरोबर मंत्री महोदयांनी संवाद साधला. सांगोला येथे आढावा बैठक घेऊन सांगोल्यातील दुष्काळीस्थितीबद्दल लोकप्रतिनिधीकडून माहिती जाणून घेतली.
       सांगोला तालुक्यासाठी शासनाच्यावतीने 13 कोटी 27 लाख रुपये प्राप्त झाल्याचे ज्येष्ठ आ. गणपतराव देशमूख यांनी सांगितले. तर येथील दुष्काळाची तीव्रता पाहता,  सांगोला तालुक्यासाठी खास बाब म्हणून दुष्काळ निर्मुलनासाठी आणखीन 1 कोटी रुपयांचा निधी शासनाच्यावतीने देण्यात यावा अशी मागणी     आ. दीपक साळूंखे - पाटील यांनी केली.
         याप्रसंगी माजी आ. शहाजी पाटील, रोहयो उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार, जिल्हा कृषी अधीक्षक अशोक किरनळ्ळी, उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र पाटील, तहसीलदार नागेश पाटील, माजी नगराध्यक्ष श्री. तांबोळी, माजी जि.प. सदस्य श्रीकांत देशमूख यांच्यासह संबंधित अधिकारी - पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top